100 टक्के इथेनॉलवर चालणार्‍या ई100 इंधनाला दिली मंजुरी

नवी दिल्ली/26 ऑक्टोबर  ;  शींहरपेश्र देशातील हरित इंधन क्रांतीला गती देण्याच्या दृष्टीने केंद्र सरकारच्या रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने सोमवारी केंद्रीय मोटार वाहन नियमांमध्ये महत्त्वपूर्ण सुधारणा अधिसूचित केली आहे. या निर्णयामुळे 100 टक्के इथेनॉलवर आधारित ई100 इंधनावर धावणार्‍या फ्लेक्स इंधन वाहनांचा मार्ग पूर्णपणे मोकळा झाला आहे.
ही वाहने प्रामुख्याने 85 टक्के इथेनॉल मिश्रित ई85 आणि 100 टक्के इथेनॉलयुक्त ई100 या दोन्ही प्रकारच्या पर्यायी इंधनांवर विनाअडथळा चालण्यास सक्षम असणार आहेत. मंत्रालयाच्या एका वरिष्ठ अधिका्याने दिलेल्या माहितीनुसार, 20 टक्क्यांपेक्षा अधिक इथेनॉलचे मिश्रण असलेल्या इंधनाचा वापर केवळ त्या विशिष्ट क्षमतेसाठी डिझाईन आणि प्रमाणित केलेल्या वाहनांमध्येच करता येणे शक्य होणार आहे. याचा थेट अर्थ असा की, सध्या रस्त्यांवर धावणार्‍या नियमित पेट्रोल किंवा 20 टक्के मिश्रण असलेल्या ई20 इंधनावर चालणार्‍या सामान्य वाहनांमध्ये ई85 किंवा ई100 या उच्च इथेनॉल मिश्रित इंधनाचा वापर करता येणार नाही. चुकीच्या इंधनाच्या वापरामुळे पारंपरिक इंजिनचे नुकसान होऊ नये, यासाठी हा स्पष्ट निकष ठेवण्यात आला आहे.

Back to top button