500 कोटींच्या कथित ऑडिओ क्लिप प्रकरणी एसआयटी स्थापन

आयपीएस शैलेश बलकवडे करणार नेतृत्व

मुख्यमंत्री फडणवीसांच्या आदेशानंतर कारवाई

मुंबई/26 ऑक्टोबर ; मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी समोर आणलेल्या 500 कोटींच्या कथित ऑडिओ क्लिप प्रकरणाची चौकशी करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निर्देशानंतर विशेष तपास पथक स्थापन करण्यात आले आहे. या एसआयटीचे नेतृत्व आयपीएस अधिकारी शैलेश बलकवडे करणार आहेत.
मनोज जरांगे पाटील यांनी पत्रकार परिषदेत एक ऑडिओ क्लिप सार्वजनिक केली होती. या क्लिपमध्ये, आंदोलनावर प्रभाव टाकण्यासाठी खासदार श्रीकांत शिंदे यांच्या माध्यमातून जरांगे पाटील यांच्यापर्यंत 500 कोटी रुपये पोहोचल्याचा कथित दावा करण्यात आला होता. दरम्यान, हा दावा श्रीकांत शिंदे तसेच जरांगे या दोघांनीही फेटाळून लावला आहे.
आयपीएस शैलेश बलकवडे यांच्या नेतृत्वाखालील टीम या ऑडिओ क्लिपची सायबर आणि फॉरेन्सिक तपासणी करेल. ही क्लिप खरी आहे की आर्टिफिशियल इंटेलिजन्स च्या साहाय्याने तयार केलेली बनावट क्लिप आहे, याचा शोध घेतला जाईल. या विशेष तपास पथकात बलकवडे यांच्यासह पोलिस उपआयुक्त विजयकांत सागर तसेच सायबर गुन्हे शाखेचे पोलिस उपआयुक्त बजरंग सोनवणे यांचा समावेश असणार आहे. या संदर्भातील एक पत्रकही प्रसिद्ध करण्यात आले आहे.दरम्यान, महाराष्ट्र पोलिस दलातील एक कर्तव्यदक्ष आणि धडाकेबाज अधिकारी म्हणून ओळखले जाणारे शैलेश बलकवडे यांनी यापूर्वी कोल्हापूर, गडचिरोली आणि जालना येथे पोलिस अधीक्षक म्हणून, तसेच पुणे आणि मुंबई क्राईम ब्रांचमध्ये महत्त्वाची जबाबदारी सांभाळली आहे. नक्षलवादविरोधी मोहिमा आणि अमली पदार्थ रॅकेट उद्ध्वस्त करण्यात त्यांचा मोठा वाटा राहिलेला आहे.

Back to top button