संत गाडगेबाबा ज्येष्ठ नागरिक मंडळाकडून सत्कार

यशदीप भोगे याला आशियाई स्पर्धेत रौप्य पदक

अमरावती /25 ऑक्टोबर -जपानमध्ये पार पडलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत तिरंदाजीच्या मैदानात अमरावतीच्या यशदीप संजय भोगे याने अचूक निशाणा साधत रौप्यपदकावर आपले नाव कोरीत इतिहास रचला. यशदीपच्या या सनसनाटी कामगिरीमुळे देश आणि संपूर्ण अमरावती जिल्ह्याची मान अभिमानाने उंचावली आहे. यशदीप हा येथील श्री शिवाजी शिक्षण संस्थेच्या डॉ. पंजाबराव देशमुख विधी महाविद्यालयाचा हुशार माजी विद्यार्थी असून, सध्या तो रेल्वे सेवा बजावत आहे. या दैदिप्यमान यशाची दखल घेत संत गाडगेबाबा ज्येष्ठ नागरिक मंडळाच्या वतीने यशदीपचा त्याच्या निवासस्थानी जाऊन यथोचित गौरव करण्यात आला. यावेळी अनिल वानखेडे यांनी भोगे कुटुंबाच्या कौटुंबिक पार्श्वभूमीची माहिती देत उपस्थितांची ओळख करून दिली. त्यानंतर मंडळाच्या पदाधिकार्‍यांच्या हस्ते यशदीपला शाल व पुष्पगुच्छ देऊन त्याच्या भावी वाटचालीसाठी उदंड शुभेच्छा देण्यात आल्या. या सोहळ्याला पुरुषोत्तम गावडो, दामोदर पवार, शिक्षणतज्ज्ञ प्राचार्य दिलीपसिंह खांगार, प्रभाकरराव उमक, धनराज निपानो, अनिल वानखेडे, संजय खोंडे, मधुकर भोपळे, नरेंद्र तायडे या सर्व पदाधिकार्‍यांसह सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Back to top button