राज्यभरात आजपासून सरकार विरोधात आंदोलन
अभियंत्यांच्या हक्कावरील अन्यायकारक निर्णय रद्द करा

60:40 कोटा पद्धतीमुळे पदोन्नतीचे मार्ग बंद
नोव्हेंबरपासून संपूर्ण शासकीय काम बेमुदत बंदची हाक
अमरावती /25 ऑक्टोबर – मृद व जलसंधारण विभागाच्या 27 मे 2026 रोजीच्या नवीन आकृतिबंधातील वादग्रस्त 60:40 कोटा पद्धतीमुळे राज्यभरातील स्थापत्य अभियंत्यांमध्ये संतापाची लाट उसळली असून, हक्काच्या पदोन्नतीवर गदा आल्याने संतप्त अभियंत्यांनी आजपासून राज्यव्यापी लढ्याचे रणशिंग फुंकले आहे. तांत्रिक कामांचा कोणताही थेट संबंध नसताना कृषी अभियंत्यांना लादणारा हा अन्यायकारक निर्णय रद्द न झाल्यास 3 नोव्हेंबरपासून संपूर्ण कामकाज बेमुदत बंद करण्याचा थेट इशारा राजपत्रित आणि कनिष्ठ अभियंता संघटनांनी दिला आहे.
शासनाने अचानक घेतलेल्या या निर्णयामुळे विभागात अनेक वर्षांपासून प्रामाणिक काम करणार्या स्थापत्य अभियंत्यांचे मोठे नुकसान होणार आहे. साठवण तलाव, पाझर तलाव, सिमेंट बंधारे, निविदा प्रक्रिया, मोजमाप नोंदवही आणि धरण सुरक्षेची सर्व कामे स्थापत्य शाखेची असताना हा वाटा परस्पर का दिला, असा रोखठोक सवाल उपस्थित होत आहे.
नवीन रचनेमुळे कार्यकारी अभियंत्यांची पदे 69 वरून थेट 46 वर घसरणार आहेत. उपअभियंत्यांची पदे 384 वरून 254 आणि सहायक अभियंत्यांची पदे 770 वरून 496 वर खाली येणार आहेत. कृषी विभागाकडून येणारी 9,942 पदे प्रत्यक्षात वर्गझालेली नसतानाही स्थापत्य अभियंत्यांवर हा अन्याय लादण्यात आला.या विरोधात आज 26 ऑक्टोबर रोजी निवेदने देऊन आंदोलनाला सुरुवात होत आहे. पुढील दोन दिवस काळ्या फिती लावून काम केले जाईल. त्यानंतर 29 ते 31 ऑक्टोबर दरम्यान डिजिटल संपर्क आणि कार्यालयीन कामावर बहिष्कार टाकला जाईल. मुंबईतील आझाद मैदानावर 2 नोव्हेंबर रोजी महाधरणे आंदोलन पुकारण्यात आले असून, 29 मे 2026 चा निर्णय मागे घेऊन 2017 चा मूळ आकृतिबंध पूर्ववत लागू होईपर्यंत लढा सुरूच राहील.





