सुरक्षित कार्यस्थळ घडवण्यासाठी पुरुषांमध्ये जाणीवजागृती आवश्यक

प्र-कुलगुरू डॉ. महेंद्र ढोरे यांचे प्रतिपादन, विद्यापीठात ‘शी-बॉक्स पोर्टल

हाताळण्याबाबत मार्गदर्शन’ विषयावर कार्यशाळा

अमरावती /23 ऑक्टोबर   : कामाच्या ठिकाणी स्त्रियांवर होणारा लैंगिक छळ रोखण्यासाठी बनवलेला 2013 चा कायदा हा फक्त महिलांच्या रक्षणासाठी नसून, समतेवर आधारलेला सशक्त समाज घडवण्यासाठी अत्यंत महत्त्वाचा दुवा आहे. महिलांना सुरक्षित वातावरण मिळाले की त्यांची कार्यक्षमता दुप्पट होते आणि त्याचा थेट फायदा संस्था, समाज आणि पर्यायाने संपूर्ण देशाला होतो. आज महिला या कायद्याबाबत जागरूक होत असल्या तरी पुरुषांच्या मनात अजूनही काही गैरसमज शिल्लक आहेत. जोपर्यंत पुरुषांची ही मानसिकता बदलत नाही आणि त्यांच्यात व्यापक जाणीवजागृती होत नाही, तोपर्यंत खर्‍या अर्थाने सुरक्षित कार्यस्थळ निर्माण होऊ शकत नाही, असे रोखठोक प्रतिपादन संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ. महेंद्र ढोरे यांनी केले.
केंद्रीय महिला व बालविकास मंत्रालयाच्या ’शी-बॉक्स’ पोर्टलची हाताळणी प्रत्येक कर्मचार्‍याने नीट समजून घेणे ही काळाची गरज बनली आहे. विद्यापीठातील वुमेन्स स्टडीज सेंटर आणि अंतर्गत तक्रार निवारण समितीच्या संयुक्त विद्यमाने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर दृकश्राव्य सभागृहात आयोजित विशेष विद्यापीठस्तरीय कार्यशाळेच्या उद्घाटन प्रसंगी ते अध्यक्षस्थानावरून बोलत होते. याप्रसंगी व्यासपीठावर वुमेन्स स्टडीज सेंटरच्या संचालक डॉ. वैशाली गुडधे, सहसमन्वयक डॉ. वैशाली धनविजय, अंतर्गत तक्रार समितीच्या अध्यक्ष डॉ. कल्पना जावळे, सचिव डॉ. सुलभ पाटील आणि मुख्य विषयतज्ज्ञ अ‍ॅड. ज्योती खांडपासोळे यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात डॉ. वैशाली गुडधे यांनी सेंटरच्या माध्यमातून गेल्या 15 वर्षांत राबवलेल्या उपक्रमांचा लेखाजोखा मांडत केवळ कायद्याने नाही. दरम्यान, डॉ. कल्पना जावळे यांनी या कायद्याची सद्यस्थिती स्पष्ट केली, तर डॉ. सुलभ पाटील यांनी विद्यापीठाशी संलग्न सर्व महाविद्यालयांनी आपल्या अंतर्गत तक्रार समितीची माहिती तात्काळ विकास विभागाकडे पाठवण्याचे आवाहन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि आभार डॉ. भगवान फाळके यांनी मानले. या कार्यशाळेला शैक्षणिक विभागातील शिक्षक, विद्यार्थी, संशोधक, प्रशासकीय अधिकारी आणि कर्मचार्‍यांनी मोठी गर्दी केली होती.

Back to top button