कर्जतचा प्रकल्प पर्यावरणपूरकच
विरोधकांचा फेक नरेटिव्ह महाराष्ट्र विरोधी

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची टीका
मुंबई /25 ऑक्टोबर : रायगड जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातील सह्याद्रीच्या पर्वतरांगेत टोरंट कंपनीच्या प्रस्तावित जलविद्युत प्रकल्पासाठी सुरू असलेल्या सुमारे 600 एकरांवरील वृक्षतोडीच्या मुद्द्यावरून स्थानिक नागरिक आणि पर्यावरणप्रेमींनी आक्रमक भूमिका घेतल्या मोठ्या वादाला तोंड फुटले आहे. राज्यात सध्या असलेल्या दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर या वृक्षतोडीविरोधात सोशल मीडियावरून व्यक्त होत असलेल्या संतप्त प्रतिक्रिया आणि विरोधी पक्षांकडून आक्रमक भूमिका घेण्यात आल्यानंतर आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रसारमाध्यमाशी संवाद साधत या प्रकल्पासाठी होत असलेल्या वृक्षतोडीबाबत स्पष्टीकरण देत महत्त्वपूर्ण माहिती दिली आहे.
कर्जत तालुक्यातील पाली तर्फे कोतवाल खलाटी आणि साई डोंगर परिसरात टोरंट कंपनीच्या प्रस्तावित जलविद्युत प्रकल्पासाठी सुमारे 600 एकरांवर वृक्षतोड सुरू आहे, त्याला होत असलेल्या विरोधाच्या पार्श्वभूमीवर प्रसारमाध्यमांशी बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, पहिली गोष्ट म्हणजे या वृक्षतोडीवरून सुरू असलेल्या दाव्यांना फेक नरेटिव्हशिवाय आणखी काही म्हणता येणार नाही. आपल्याकडे पंप स्टोरेज म्हणजेच हायड्रल पॉवर ही क्लीन पॉवर आहे, स्वच्छ पॉवर आहे. ही प्रदूषण न करणारी ऊर्जा आहे. आपण सध्या सौरऊर्जेद्वारे वीजनिर्मितीसाठी मोठी क्षमता विकसित केली आहे. आपला पीक अवर हा संध्याकाळनंतर असतो. मात्र संध्याकाळनंतर सौरऊर्जा मिळत नाही. त्याला पर्याय म्हणून औष्णिक वीज वापरली तर मोठ्याप्रमाणावर प्रदूषण होतं. याला पर्याय म्हणून पंप स्टोरेजच्या माध्यमातून क्लीन एनर्जी ही वापरण्याच्या दृष्टीने महाराष्ट्र पंप स्टोरेजचा हब झालेला आहे. त्यामधीलच हा एक प्रकल्प आहे. या प्रकल्पाच्या माध्यमातून तीन हजार मेगावॅट एवढी वीजनिर्मिती होणार आहे. तसेच ही पूर्णपणे स्वच्छ ऊर्जा असणार आहे, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
या प्रकल्पासाठी लागणार्या वृक्षतोडीबाबत म्हणाले की, यामधील सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे या प्रकल्पासाठी जी जागा घेतलेली आहे, त्या ठिकाणी रिझर्व्हायर तयार होणार आहे, तलाव तयार होणार आहे. तिथे पाण्याची साठवणूक होणार आहे. जसं आपण धरण तयार करतो, तशी धरणाकरता ती जागा घेतली आहे. या बदल्यात जवळपास तीन पट जागा संबंधित कंपनीने वनविभागाला दिली आहे. वनविभाग कंपनीच्या खर्चाने त्या ठिकाणी 30 हजार झाडं आणि 60 हजार झाडं या साईटवर, अशी 90 हजार झाडं लावणार आहे, अशी माहिती देवेंद्र फडणवीस यांनी दिली.





