भारताला जगद्गुरू बनविण्यासाठी तरुणांनी पुढाकार घ्यावा

दुष्काळग्रस्त बळीराजाला तातडीने मदत करण्याचा सल्ला

आरएसएसचे श्यामजी हरकरे यांचे आवाहन

अमरावती /25 ऑक्टोबर – शहरात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा विजयादशमी आणि शस्त्रपूजन सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. याप्रसंगी पश्चिम क्षेत्र कार्यकारिणी सदस्य श्यामजी हरकरे यांनी समाजातील सज्जन शक्ती एकत्र आणून देशाला जगद्गुरू बनविण्याचे आवाहन केले. शेतकरी संकटात सापडला असून त्याला प्रत्यक्ष मदतीची गरज असल्याचे उद्योगपती विनीतजी श्रीराम यांनी मांडले. शिस्तबद्ध संचलन आणि मान्यवरांच्या उपस्थितीने हा सोहळा लक्षवेधक ठरला.
समाजात काम करणार्‍या चांगल्या लोकांना सोबत घेऊन बलशाली समाज उभा करणे ही काळाची गरज आहे. नव्या पिढीने जागृत होऊन सकारात्मक बदलासाठी सामूहिक प्रयत्न करायला हवेत. तरुण पिढीने शेती, उद्योग, व्यापार आणि सामाजिक क्षेत्रात पुढाकार घ्यावा, असे आवाहन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पश्चिम क्षेत्र कार्यकारिणी सदस्य श्यामजी हरकरे यांनी केले. अमरावती महानगर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या वतीने श्रीमती नरसम्मा हिरय्या महाविद्यालयाच्या मैदानावर विजयादशमी आणि शस्त्रपूजन उत्सव मोठ्या उत्साहात पार पडला. त्यावेळी ते बोलत होते.कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून उद्योगपती विनीतजी श्रीराम उपस्थित होते. तसेच व्यासपीठावरविभाग संघचालक चंद्रशेखर भोंदू, महानगर संघचालक उल्हास बपोरीकर हजर होते. या मेळाव्यात भाजप नेत्या माजी खा. नवनीत राणा यांची विशेष उपस्थिती राहिली. भारताची संस्कृती आणि हिंदू समाजाचे अस्तित्व अनेक संकटांनंतरही कायम टिकून राहिले आहे. संघाच्या कार्याचा विस्तार होत असताना विरोधाचे प्रमाणही वाढताना दिसत आहे. जगभरातील घडामोडींमागील विचार समजून घेत हिंदू समाजाला कमजोर करण्याचे डाव हाणून पाडले पाहिजेत. बदलत्या काळात नव्या पिढीने अधिक सतर्क राहून कुटुंब आणि समाज व्यवस्था भक्कम राखायला हवी.
आजच्या काळात हिंदू समाजातील घटणारा जन्मदर आणि बदलती कुटुंबव्यवस्था ही मोठी चिंता बनली आहे. तरुणांनी समाजमाध्यमांवर वाहून न जाता विविध विषयांचा सखोल अभ्यास केला पाहिजे. घराघरांमध्ये उत्तम संस्कार आणि कुटुंबसंस्था टिकवून ठेवण्यावर भर दिला गेला पाहिजे. समाजातील सज्जन व्यक्तींना सोबत जोडून प्रत्येकाने गाव आणि परिसराच्या विकासासाठी काम करायला हवे.
गावाकडच्या शेतकर्‍यांना जगवण्यासाठी सेंद्रिय शेती, कमी उत्पादन खर्च, योग्य प्रशिक्षण आणि गावातच रोजगाराच्या संधी निर्माण झाल्या पाहिजेत. सेंद्रिय शेतीसाठी लागणारे बियाणे, मार्गदर्शन आणि नवीन संधी तरुणांना मिळवून देणे गरजेचे आहे. तरुण पिढीने उद्योग आणि शेतीपूरक व्यवसाय सुरू करावेत. जुन्या जाणत्या पिढीने या तरुणांना संपूर्ण पाठबळ दिले पाहिजे.
या हंगामात पावसाच्या लहरीपणामुळे शेतकरी बांधवांवर मोठे संकट ओढवले आहे. त्यामुळे व्यापारी, व्यावसायिक आणि नागरिकांनी केवळ सहानुभूती न दाखवता बळीराजाला प्रत्यक्ष मदतीचा हात दिला पाहिजे. शेतकरी जगला तरच आपण सर्व जगू शकू, ही भावना समाजाने मनात ठेवली पाहिजे. तरुणांनी मोठी स्वप्ने उराशी बाळगून ती पूर्ण होईपर्यंत जिद्दीने प्रयत्न केले पाहिजेत, असा आग्रह यावेळी धरण्यात आला.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला स्वयंसेवकांनी घोष पथकासह शहरात दोन दलांमध्ये शिस्तबद्ध पथसंचलन काढले. जागोजागी रांगोळ्या काढून आणि फुलांची उधळण करून नागरिकांनी या पथसंचलनाचे जल्लोषात स्वागत केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक आणि वक्त्यांचा परिचय उल्हास बपोरीकर यांनी करून दिला. निखिल किन्हीकर यांनी सांघिक गीत, स्वप्निल गुंडे यांनी वैयक्तिक गीत तर आकाश मानकर यांनी अमृतवचन सादर केले. विजय शेलूकर यांनी प्रार्थना घेतली. या सोहळ्याला संघाचे पदाधिकारी, स्वयंसेवक आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
शिस्तबद्ध पथसंचलनाने वेधले सर्वांचे लक्ष-दोन दलांमध्ये शिस्तबद्धरीतीने निघालेल्या पथसंचलनाने अमरावतीकरांचे लक्ष वेधले. घोष पथकाच्या तालावर पाऊल टाकत स्वयंसेवकांनी शहरात शिस्त दाखवून दिली. रस्त्यांवर ठिकठिकाणी आकर्षक रांगोळ्या काढून नागरिकांनी स्वयंसेवकांवर फुलांची उधळण केली. अमरावतीकरांनी या संचलनाचे जोरदार स्वागत करून कार्यक्रमाचा उत्साह द्विगुणित केला. या शानदार सोहळ्याची शहरात चांगलीच चर्चा रंगली.

Back to top button