दुर्गा मंडपात तरुणाला चाकूचा धाक दाखवून लुटले

राजापेठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

अमरावती /25 ऑक्टोबर – राजापेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील रवी नगर परिसरात दुर्गा मंडपात प्रसाद वाटप सुरू असताना 6 ते 7 तरुणांनी गोंधळ घालत एका तरुणाला चाकूचा धाक दाखवून मारहाण केली. त्याच्या खिशातील 500 रुपये हिसकावून घेतल्याचा प्रकार शुक्रवारी रात्री घडला. या प्रकरणी राजापेठ पोलिसांनी ऋषिकेश उंबरकर, रोशन पिंजरकर यांच्यासह 6 जणांविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी प्रसाद वानखडे (29) यांनी पोलिसांत तक्रार दिली आहे. तक्रारीनुसार, रवी नगर परिसरातील दुर्गा मंडळासमोर प्रसाद वाटप सुरू होते. त्यावेळी ऋषिकेश उंबरकर, रोशन पिंजरकर आणि त्यांचे साथीदार मंडपात आले. त्यांनी पंगतीजवळ येऊन आरडाओरड सुरू केली. शिवीगाळ करीत त्यांनी परिसरात दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला. या वेळी काही तरुणांच्या हातात चाकूसारखी धारदार हत्यारे असल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. अचानक कंबरेतून चाकू काढून त्यांनी परिसरात दहशत पसरवण्याचा प्रयत्न केला. याच गोंधळात एका तरुणाला चाकूने वार करून जखमी करण्यात आले. त्यानंतर त्याच्या खिशातील 500 रुपये जबरदस्तीने काढून घेतल्याचे तक्रारीत नमूद आहे. धार्मिक कार्यक्रम सुरू असताना घडलेल्या या प्रकारामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले. घटनेची माहिती मिळाल्यानंतर राजापेठ पोलिसांनी प्रकरणाची नोंद घेतली. ऋषिकेश उंबरकर, रोशन पिंजरकर यांच्यासह एकूण 6 जणांविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या कलम 191 (2), 191 (3), 296 आणि 119 (1) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास राजापेठ पोलीस करीत आहेत.

Back to top button