राज्यातील 1,218 महाविद्यालयांतील 18,534 विद्यार्थ्यांचे भविष्य अंधारात

महाराष्ट्रातील आठ विभागात सावळागोंधळ

अमरावती जिल्ह्यातील 124 कनिष्ठ महाविद्यालयांचा सहभाग

बारावी परीक्षेचा अर्ज भरताना संगणकीय अडचण
युडायस प्रणालीत नोंद नसल्याने अर्ज नाकारले
संस्थाचालकांच्या हलगर्जीपणाचा विद्यार्थ्यांना जबर फटका

अमरावती/26 ऑक्टोबर  – स्थानिक अमरावती जिल्ह्यातील तब्बल 124 कनिष्ठ महाविद्यालयांमधील 1,137 मुलांसह राज्यातील 18,534 विद्यार्थ्यांना अकरावीत बेकायदेशीर थेट प्रवेश दिल्याने त्यांची केंद्र सरकारच्या युडायस संगणक प्रणालीत नोंदणीच झाली नसून आता बारावीचा परीक्षा अर्ज भरता न आल्याने राज्यातील 1,218 कनिष्ठ महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांचे संपूर्ण शैक्षणिक वर्ष अंधारात सापडले.
दोन वर्षे जीवाचे रान करून बारावी परीक्षेची तयारी करणार्‍या पोरांवर आता डोक्याला हात धरून बसण्याची वेळ आली. प्रत्यक्ष बारावीचा परीक्षा अर्ज भरण्यासाठी कनिष्ठ महाविद्यालयांत गेलेल्या विद्यार्थ्यांना संगणक प्रणालीत आपले नावच नोंदवले नसल्याचे समजताच त्यांच्या पायाखालची जमीन सरकली. अकरावीचे सर्व प्रवेश केवळ संगणकीय पद्धतीने करण्याचे शासनाचे कडक नियम असतानाही अमरावतीसह राज्यातील संस्थाचालकांनी स्वतःच्या जागा भरण्यासाठी विद्यार्थ्यांना परस्पर थेट प्रवेश वाटले. आता हीच बेकायदा चलाखी विद्यार्थ्यांच्या अंगाशी आली असून त्यांना परीक्षेपासून वंचित ठेवले जात आहे.
अमरावती जिल्ह्याचा विचार करता मेळघाटच्या धारणी आणि चिखलदरा या दुर्गम भागापासून ते चांदूर रेल्वे, मोर्शी, अचलपूर, वरुड, तिवसा, धामणगाव, दर्यापूर, अंजनगाव आणि अमरावती शहरात शिकायला आलेल्या शेतकरी आणि कष्टकर्‍यांच्या 1,137 पोरांचे प्रचंड नुकसान झाले. महाविद्यालयांनी अकरावीत लाखो रुपयांचे शुल्क उकळून पोरांना वर्गात बसवले, मात्र त्यांची माहिती केंद्र सरकारच्या प्रणालीत पाठवलीच नाही. आता ऐन परीक्षेच्या उंबरठ्यावर या मुलांची नावे संगणकात दिसत नसल्याने पालक आणि विद्यार्थ्यांवर आभाळच कोसळले.
हा गैरप्रकार केवळ अमरावतीपुरता मर्यादित नसून संपूर्ण महाराष्ट्रातील आठ विभागांमध्ये हा सावळागोंधळ पसरला. राज्यातील तब्बल 1,218 कनिष्ठ महाविद्यालयांनी असे नियमबाह्य प्रवेश दिले. या गैरकारभारात मुंबई विभागात सर्वाधिक 6,478 विद्यार्थ्यांचे नुकसान झाले. त्यापाठोपाठ पुणे विभागात 2,593, नाशिक विभागात 2,206, नागपूर विभागात 1,945, छत्रपती संभाजीनगर विभागात 1,718, कोल्हापूर विभागात 1,611, अमरावती विभागात 1,137 आणि लातूर विभागात846 विद्यार्थी या तांत्रिक चक्रव्यूहात अडकले. कनिष्ठ महाविद्यालयांनी स्वतःच्या आर्थिक लाभासाठी शासनाचे नियम पायदळी तुडवले.वर्षभर पोरं अकरावी शिकून बारावीत गेली तरी शिक्षण विभागातील जबाबदार अधिकार्‍यांना या अनधिकृत प्रवेशांचा थांगपत्ता कसा लागला नाही हा संतप्त प्रश्न अमरावती आणि संपूर्ण राज्यात विचारला जात आहे. संस्थाचालक आणि अधिकार्‍यांच्या साठमारीत खेड्यापाड्यातील निष्पाप मुलांचे संपूर्ण एक वर्ष वाया जाण्याची वेळ आली. शिक्षण विभागाने तातडीने संगणक प्रणाली खुली करून अमरावतीसह राज्यातील सर्व विद्यार्थ्यांचे बारावीचे अर्ज भरण्याचा मार्ग मोकळा करावा अशी मागणी आता राज्यभरातून जोर धरत आहे.

विभागनिहाय बाधित महाविद्यालये व विद्यार्थी संख्या
राज्यातील आठही विभागांमधील 1,218 कनिष्ठ महाविद्यालयांतील 18,534 विद्यार्थ्यांचे भविष्य धोक्यात आले.
अमरावती 124 महाविद्यालये व 1,137 विद्यार्थी
छत्रपती सं. 175 महाविद्यालये व 1,718 विद्यार्थी
कोल्हापूर 170 महाविद्यालये व 1,611 विद्यार्थी
लातूर 83 महाविद्यालये व 846 विद्यार्थी
मुंबई 193 महाविद्यालये व 6,478 विद्यार्थी
नागपूर 178 महाविद्यालये व 1,945 विद्यार्थी
नाशिक 118 महाविद्यालये व 2,206 विद्यार्थी
पुणे 177 महाविद्यालये व 2,593 विद्यार्थी

Back to top button