महायुतीचे किरण सरनाईक यांची विजयाकडे वाटचाल?
तिसर्या फेरीपर्यंत सरनाईक यांची आघाडी कायम

काँग्रेसच्या अदिती पोहरे यांची दुसर्या स्थानी झेप
डॉ. श्रीकांत देशपांडे तिसर्या क्रमांकावर
विजयाचा 16,134 मतांचा कोटा निश्चित
दुसर्या पसंतीच्या मतांवर विजयाची मदार
मध्यरात्रीनंतर बाद फेरीच्या मोजणीस सुरुवात
अमरावती/27 ऑक्टोबर – विधानपरिषदेच्या अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत मतमोजणीच्या तिसर्या फेरीअखेर राजकीय वातावरण चांगलेच तापले. लोकशाही भवनात पहिल्या पसंतीच्या मतांची मोजणी पार पडली असून महाविकास आघाडी आणि अपक्षांची ताकद पाठीशी असलेले उमेदवार किरण रामराव सरनाईक यांनी पहिल्या फेरीपासून घेतलेली आघाडी शेवटपर्यंत कायम राखली. तीन फेर्या मिळून एकूण 33,034 मतांची मोजणी झाली. यामध्ये 32,266 मते वैध ठरली तर 768 मते बाद झाली. विजयासाठी आवश्यक असलेला 16,134 मतांचा कोटा कुणालाही गाठता न आल्याने निवडणूक आता बाद फेरीच्या वळणावर आली होती.
किरण सरनाईक यांनी पहिल्या फेरीत 3,903, दुसर्या फेरीत 3,334 आणि तिसर्या फेरीत 925 अशी एकूण 8,162 मते घेतली. दुसर्या क्रमांकाच्या जागेसाठी काँग्रेसच्या अदिती पोहरे आणि बंडखोर डॉ. श्रीकांत देशपांडे यांच्यात जोरदार रस्सीखेच पाहायला मिळाली. तिसर्या फेरीत पोहरे यांनी तब्बल 1,104 मते खेचून आणत एकूण मते 4,688 वर नेली. सुरुवातीला दुसर्या स्थानावर असलेले डॉ. देशपांडे यांना तिसर्या फेरीत केवळ 473 मते मिळाल्याने त्यांची एकूण मते 4,668 झाली. अवघ्या 20 मतांच्या फरकाने पोहरे यांनी देशपांडे यांना मागे टाकत दुसर्या स्थानी झेप घेतली. पहिल्या पसंतीत कोणालाही स्पष्ट बहुमत न मिळाल्याने निवडणूक निर्णय अधिकार्यांनी बादफेरीची किचकट प्रक्रिया सुरू केली.शिक्षक संघटनेचे सुरेश गीताबाई बाबूराव देवकर यांनी 3,236 मते घेत मोठी चुरस निर्माण केली. विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाचे दिलीप भीमरावजी कडू यांनी 2,674 मते मिळवली. शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार दत्तात्रय श्रीराम लहाने यांनी 2,155 मते पदरात पाडली. भाजपचे खा. डॉ. अनिल बोंडे यांच्या भगिनी डॉ. संगीता सचिंद्र शिंदे बोंडे यांनी 1,964 मते घेतली. भाजपचे दुसरे बंडखोर चंद्रशेखर उर्फ शेखर मनोहरराव भोयर यांनी 1,375 मते मिळवली. नुटा समर्थित डॉ. प्रशांत विश्वेश्वर विघे यांनी 1,267 मते तर विजुक्टाचे डॉ. अविनाश मधुकरराव बोर्डे यांनी 1,026 मते मिळवली.
या निवडणुकीत रिंगणात उतरलेल्या सर्व 26 उमेदवारांना मिळालेली पहिल्या पसंतीची मते खालीलप्रमाणे राहिली. अदिती ऋषिकेश पोहरे यांना 4,688 मते, दत्तात्रय श्रीराम लहाने यांना 2,155 मते, किरण रामराव सरनाईक यांना 8,162 मते, प्रा. अनिल मधुकरराव काळे यांना 11 मते, गजानन गोविंदराव ढोके यांना 21 मते, सुरेश गीताबाई बाबूराव देवकर यांना 3,236 मते, डॉ. अविनाश मधुकरराव बोर्डे यांना 1,026 मते, अशोक वामन हिवाळे यांना 6 मते, आशिष मनोहर अंबुलकर यांना 34 मते, उपेंद्र बाबाराव पाटील यांना 12 मते, दिलीप भीमरावजी कडू यांना 2,674 मते, विनोद प्रल्हाद कडू यांना 30 मते, गजानन रामचंद्र उल्हे पाटील यांना 467 मते, किरण अर्जुन चौधरी यांना 177 मते, किरण अर्जुन पवार यांना 11 मते, डॉ. प्रशांत विश्वेश्वर विघे यांना 1,267 मते, प्रा. मिलिंद तुकाराम ब्रम्हाणे यांना 6 मते, चंद्रशेखर उर्फ शेखर मनोहरराव भोयर यांना 1,375 मते, राजेशकुमार शालिग्राम काड यांना 32 मते, रामदास संपतराव कटक यांना 5 मते, डॉ. श्रीकांत गोविंद देशपांडे यांना 4,668 मते, श्रीकृष्ण सूर्यभान पहूरकर यांना 6 मते, डॉ. सुमीत सुरेशराव पवार यांना 152 मते, डॉ. संगीता सचिंद्र शिंदे बोंडे यांना 1,964 मते, संतोष श्रीकृष्ण हुशे यांना 74 मते, हेमलता दिलीपसिंग मुनोत देवडा यांना 7 मते मिळाली . पहिल्या पसंतीत कुणालाही कोटा पूर्ण गाठता न आल्याने आता कमी मते मिळालेल्या उमेदवारांची दुसरी पसंती कुणाला तारणार याकडे संपूर्ण विभागाचे लक्ष लागले.
बाद फेरीकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष..
अमरावती विभाग शिक्षक मतदार संघाच्या मतमोजणीत बाद फेरीच्या प्रक्रियेला वेग आला असून निकालाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. रात्री उशिरा बाद फेरीची मोजणी सुरु झाली असतांना फेरी क्र. 1 मध्ये रामदास कटक (5 मते), फेरी क्र. 2 मध्ये श्रीकृष्ण पहूरकर (6 मते) आणि फेरी क्र. 3 मध्ये अशोक हिवाळे (6 मते) हे तीन उमेदवार बाद ठरले आहेत. सद्यस्थितीत मतमोजणी केंद्रावर पुढील फेरीची बाद प्रक्रिया वेगाने सुरू आहे.
14 टेबलांवर 33 हजार मतांची मोजणी
अमरावती विभागातील पाचही जिल्ह्यांतून नोंदणीकृत 35,810 मतदारांपैकी तब्बल 33,034 शिक्षकांनी मतदानाचा हक्क बजावला होता. विद्यापीठ मार्गावरील लोकशाही भवनात 14 टेबलांवर 175 अधिकारी कर्मचार्यांच्या उपस्थितीत मतमोजणी पार पडली. मतपत्रिकांचे 25 चे गठ्ठे करून तीन टप्प्यांत मोजणी झाली. विक्रमी 92.25 टक्के मतदान झाल्याने निकालाची उत्सुकता दिवसभर ताणली गेली.
दुसर्या पसंतीच्या मतांवर उमेदवारांचे भाग्य
पहिल्या फेरीत 16,134 मतांचा निश्चित कोटा कोणालाही पूर्ण करता न आल्याने निवडणूक निर्णय अधिकार्यांनी बाद फेरीची प्रक्रिया हाती घेतली. सर्वात कमी मते मिळवणार्या उमेदवाराला बाद करून त्याच्या पसंतीची मते आघाडीवरील उमेदवारांना वाटली जाणार आहेत. ही प्रक्रिया संपेपर्यंत बराच वेळ लागणार असल्याने निकाल मध्यरात्रीनंतर किंवा पहाटेपर्यंत लांबण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे.
देशपांडे यांच्या बंडखोरीने चुरस वाढली
या निवडणुकीत माजी आ. डॉ. श्रीकांत देशपांडे यांच्या बंडखोरीने राजकीय समीकरणांना मोठा धक्का दिला. पहिल्या दोन फेर्यांमध्ये देशपांडे दुसर्या क्रमांकावर टिकून होते. मात्र तिसर्या फेरीत काँग्रेसच्या अदिती पोहरे यांनी 1,104 मते खेचून आणत 20 मतांची आघाडी घेतली. मतांची प्रचंड विभागणी झाल्यामुळे कोणत्याही उमेदवाराला पहिल्या फेरीत बाजी मारता आली नाही.





