कोहना येथे आदिवासी कुटुंबांसोबत दिवाळीचा आनंद

गरजूंना कपडे आणि उबदार ब्लँकेटची मदत

ज्येष्ठांचा सन्मान करत मुलांना फटाक्यांचे वाटप

अमरावती /28 ऑक्टोबर – दुर्गम भागातील आदिवासी कुटुंबांपर्यंत दिवाळीचा आनंद पोहोचवण्यासाठी गाडगे महाराज संस्थेच्या वतीने कोहना गावात विशेष उपक्रम राबविण्यात आला. या वेळी गरजू कुटुंबांना कपडे, साड्या, लुगडे, उबदार पांघरूणे, तर लहान मुलांना नवीन कपडे आणि फटाके देण्यात आले. ज्येष्ठ नागरिकांना सुगंधी उटणे लावून अभ्यंगस्नान घालण्यात आले. नवीन वस्त्रे देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला. या उपक्रमामुळे आदिवासी कुटुंबांच्या दिवाळीत आनंदाची भर पडली.
श्रीक्षेत्र नागरवाडी येथील गाडगे महाराज संस्थेचे संचालक सागर बापूसाहेब देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. मुंबईतील दिवंगत संतोषकुमारजी झुनझुनवाला यांच्या स्मरणार्थ सीतादेवी झुनझुनवाला आणि त्यांच्या कुटुंबाने या उपक्रमासाठी विशेष सहकार्य केले. कार्यक्रमात आदिवासी महिलांना साड्या आणि लुगडे, मुलींना नवीन कपडे, गरजू कुटुंबांना उबदार पांघरूणे, ज्येष्ठांना धोतर, तर मुलांना फटाके देण्यात आले. गावातील ज्येष्ठांना उटणे लावून अभ्यंगस्नान घालण्यात आले. नवीन कपडे देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला. यावेळी सागर बापूसाहेब देशमुख यांनी भजन-कीर्तनातून व्यसनमुक्तीचा संदेश दिला. पालकांनी मुलांना शिक्षण द्यावे, असे आवाहन करत आदिवासी मुलांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी संस्थेच्या वतीने शक्य ते सहकार्य करण्याचे आश्वासन त्यांनी दिले. कार्यक्रमाच्या शेवटी सर्व कुटुंबांसाठी मसालेभात आणि बुंदीच्या लाडवांची भोजनव्यवस्था करण्यात आली. या वेळी सीतादेवी झुनझुनवाला, संदीप झुनझुनवाला, सारिकाबेन झुनझुनवाला, नितीनजी दलवी, प्रा. अरविंद देशमुख, समाजप्रबोधनकार भारत महाराज रेले, कुणाल देशमुख, वसंतराव देशमुख, प्रकाश महात्मे, गजानन जवंजाळ, सुखदेवशेठ भुतडा, किशोर चौधरी, भुगुल सर यांच्यासह नागरवाडी येथील सेवक उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संस्थेचे शिक्षक, कर्मचारी आणि सेवकांनी मेहनत घेतली. ग्रामस्थांनी झुनझुनवाला कुटुंब आणि सागर बापूसाहेब देशमुख यांचे आभार मानले.

Back to top button