विसर्जन मिरवणुकीवर पोलिसांची कारवाई
नांदगाव खंडेश्वरमध्ये ध्वनिवर्धक वाहनावर दगडफेक

सिंभोरा येथे ध्वनिपातळी 99.4 डेसिबलवर; आयोजकांवर गुन्हा दाखल
अमरावती /27 ऑक्टोबर – दुर्गा विसर्जन मिरवणुकीत नियमांचे उल्लंघन करून मोठ्या आवाजात ध्वनिवर्धक वाजवणे आणि त्यावरून झालेल्या वादात वाहनावर दगडफेक करण्याच्या दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये मोर्शी आणि नांदगाव खंडेश्वर पोलिसांनी कारवाई सुरू केली आहे. सिंभोरा येथे ध्वनिपातळी तब्बल 99.4 डेसिबल नोंदविण्यात आली. याप्रकरणी आयोजकांसह संबंधितांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दुसरीकडे, नांदगाव खंडेश्वर येथे ध्वनिवर्धक वाजवण्यावरून वाद झाल्यानंतर वाहनावर दगडफेक करण्यात आली. या दोन्ही घटनांमुळे विसर्जन मिरवणुकीतील नियमांचे पालन आणि सार्वजनिक शांततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.
मोर्शी तालुक्यातील सिंभोरा गावात दुर्गा विसर्जन मिरवणुकीदरम्यान मोठ्या क्षमतेची ध्वनिवर्धक यंत्रणा लावून मोठ्या आवाजात संगीत वाजवले जात होते. यामुळे स्थानिक नागरिक, महिला आणि ज्येष्ठ नागरिकांना त्रास होत असल्याच्या तक्रारी करण्यात आल्या. पोलिसांनी ध्वनिपातळी तपासली असता ती 99.4 डेसिबलपर्यंत पोहोचल्याचे समोर आले. या प्रकरणी पोलीस उपनिरीक्षक सूरज इंगळे यांच्या तक्रारीवरून कृष्णा सोनारे, उपाध्यक्ष मनोज धुर्वे, सचिव लुकेश देवताळे, कोषाध्यक्ष राजेश बहुरूपी आणि सागर देवघरे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, नांदगाव खंडेश्वर येथे 24 ऑक्टोबर रोजी दुपारी चौकात ध्वनिवर्धक वाजवण्यावरून वाद झाला. पोलिसांच्या सूचना आणि नोटीस देऊनही गाणी वाजवण्यावरून वाद वाढल्याची माहिती आहे. त्यानंतर ध्वनिवर्धक वाहनावर दगडफेक करण्यात आली. या घटनेप्रकरणी पोलीस शिपाई रेखा चव्हाण यांच्या तक्रारीवरून राहुल प्रकाश उदबंगले, मनोज ऊर्फ मान्या सुधाकर राठोड (दोघेही रा. नांदगाव खंडेश्वर) आणि मोयार्या ध्वनिवर्धकचे मालक रामकिसन विजय राठोड (वय 27, रा. धामणी खंडी, ता. कारंजा लाड) यांच्यासह अन्य संशयितांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दोन्ही प्रकरणांचा तपास पोलीस करीत आहेत.





