शिंदे- फडणवीस आम्हाला फसवतायत

12 सप्टेंबरला अंतरवालीत या; मनोज जरांगेंचे मराठ्यांना आवाहन

जालना/7 सप्टेंबर  : मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मागण्यांसाठी गेल्या 10 दिवसांपासून जालना येथील अंतरवाली सराटी येथे मनोज जरांगे पाटील यांचे उपोषण सुरु आहे. काही दिवसांपूर्वी सरकारच्या शिष्टमंडळाने 3 सप्टेंबर रोजी भेट घेत त्यांच्या अनेक मागण्यांवर सहमती दर्शवत अनेक आश्वासने दिली. पण, यावेळी एकही मागणी पूर्ण न झाल्याचे आरोप करत मनोज जरांगे पाटील यांनी पाणी घेणे आणि सलाईन लावणे सोडले. यानंतर आता दहाव्या दिवशी सोमवारी (7 सप्टेंबर) मराठा आंदोलकांना मोठे आवाहन केले आहे.
मराठा आंदोलकांशी तसेच माध्यमांशी संवाद साधताना मनोज जरांगेपाटील म्हणाले की, सरकार जाणूनबुजून हलगर्जीपणा करत आहेत. मराठ्यांना संपवण्यासाठी जाणीवपूर्वक हा प्रकार सुरु आहे. यामुळे मराठा समाजाच्या लोकांमध्ये रोष वाढत आहे. उपोषणाला बसण्याची वेळ येणार नाही, असे मंत्री म्हणाले होते. हे सर्वजण गोड बोलून आपल्याला फसवत आहेत. शिंदे-फडणवीसांची ही मिलीभगत असून मराठा समाजाने आता समजून घेणे फार गरजेचे आहे, असा गंभीर आरोप त्यांनी यावेळी केला.
मुंबईत एकाजरी तरुणाचे माय माऊलीचे किंवा बांधवांचे रक्त सांडले तर 10 मिनिटांत उभा महाराष्ट्र बंद पडला पाहिजे, असे मनोज जरांगे पाटील यांनी आवाहन केले. मुख्यमंत्री फडणवीस यांनी डाव रचून हल्ला केला तर 10 मिनिटात महाराष्ट्र जाम झाला पाहिजे. पोलिसांनी हल्लाच केला तर पळू नका, चेंगराचेंगरी होते. बंदूक काही करत नाही. पोरांनी धरली तर त्यांना वळवळ करता येणार नाही. मुंबईमध्ये दबा धरा, पावनखिंडीत दबा मावळ्यांनी धरला होता. स्वसंरक्षण करण्यासाठी दबा धरा. गेम तर वाजला पाहिजे आणि दिसला नाही पाहिजे. सरकारला कळतच नसेल तर नाईलाज आहे, असेही ते यावेळी म्हणाले.

Back to top button