डॉक्टरांना मारहाण करणार्यांना मोकाट सोडू नका
महाराष्ट्रातील घटनेबाबत सर्वोच्च न्यायालय संतप्त

रमेश म्हात्रेंना सर्वोच्च न्यायालयाचा दणका
नवी दिल्ली/7 सप्टेंबर : काही दिवसांपूर्वी म्हणजेच 6 जुलै रोजी एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचे नगरसेवक रमेश म्हात्रे यांनी डोंबिवलीतील शास्त्रीनगर रुग्णालयात डॉक्टरांना केलेल्या मारहाण केल्याची घटना घडली होती. या प्रकरणाचे राज्यात मोठे पडसाद पाहायला मिळाले होते. या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी (7 सप्टेंबर) झालेल्या सुनावणीदरम्यान, अत्यंत कडक शब्दांत ताशेरे ओढले. अशा लोकांना रस्त्यावर फिरण्याचा अधिकार नाही, असे म्हणत सर्वोच्च न्यायालयाने टिपण्णी केली.
सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती विक्रम नाथ आणि न्यायमूर्ती संदीप मेहता यांच्या खंडपीठासमोरया प्रकरणाची महत्त्वपूर्ण सुनावणी पार पडली. मुंबई उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशाला आव्हान देणारी याचिका शिवसेना नगरसेवक रमेश म्हात्रे यांनी सर्वोच्च न्यायालयात दाखल केली होती. पण, न्यायालयाचा आक्रमक पवित्रा पाहून म्हात्रे यांचे वकील, ज्येष्ठ विधीज्ञ मुकुल रोहतगी यांनी ही याचिका मागे घेण्याची परवानगी मागितली. खंडपीठाने ती फेटाळून लावत याचिका मागे घेण्यास परवानगी दिली.
सुनावणीदरम्यान न्यायमूर्तींनी रमेश म्हात्रे आणि त्यांच्या विचारसरणीवर तीव्र संताप व्यक्त केला. डॉक्टरांच्या केबिनमध्ये घुसून त्यांना अमानुषपणे मारहाण करणे कसे समर्थनीय ठरू शकते? हा फक्त कायदा व सुव्यवस्थेचाच नव्हे, तर सार्वजनिक सुरक्षेचाही अत्यंत गंभीर प्रश्न आहे. असे मत न्यायालयाने नोंदवले. डॉक्टरांवर हल्ला करणार्यांना जामीन मिळण्याचा अधिकार नाही. डॉक्टरांवर हल्ला करणारे राजकीय नेते किंवा कार्यकर्ते मोकाट फिरता कामा नये. अशा व्यक्तींना तातडीने ताब्यात घेऊन त्यांच्याविरोधात कठोर कारवाई करण्यात यावी, असे निर्देशही सर्वोच्च न्यायालयाने राज्य सरकारला दिले आहेत. डॉक्टरांवर हल्ला करणार्यांविरोधात कठोर कारवाई झाली पाहिजे, जेणेकरून भविष्यात अशा प्रकारच्या घटनांना आळा बसेल, अशी भूमिकाही सर्वोच्च न्यायालयाने व्यक्त केली.





