हिंगोलीत रिक्षा-पिकअपची भीषण धडक;तिघांचा मृत्यू

मृतकांमध्ये चिमुरडीसह माय-लेकीचा समावेश, चौघे गंभीर

हिंगोली – औंढा मार्गावर भीषण अपघात

हिंगोली/7सप्टेंबर : ऑटोरिक्षा आणि पीक-अप या दोन वाहनांची समोरासमोर जोरदार धडक होऊन त्यात तीन जण ठार तर चार जण जखमी झाल्याची घटना 7 सप्टेंबर रोजी दुपारी 3:30 वाजण्याच्या सुमारास घडली. मृतांमध्ये मायलेकींचा समावेश असल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे.
औंढा नागनाथ ते झिरोफाटा या रस्त्यावर कळंबा पाटी ते गुंडा पाटी या दरम्यान हा अपघात झाला. एक ऑटोरिक्षा परभणीकडून औंढा नागनाथकडे जात होता. त्याच वेळी जवळबाजारकडून परभणीच्या दिशेने पीक-अप जात होता. या दोन्ही वाहनांची समोरासमोर जोराची धडक झाली. या अपघातात ऑटोरिक्षामधील एक वर्षाची मुलगी अदविका संदीप साळवे (2 वर्षे, रा. औंढा नागनाथ) आणि प्रज्ञासंदीप साळवे (30, रा. औंढा) या मायलेकींचा मृत्यू झाला आहे. अन्य एक दहा ते बारा वर्षे वयाचा मुलगा अपघातात दगावला असून, हे वृत्त लिहिपर्यंत त्याची ओळख पटली नव्हती. अपघातातील मयत अदविका साळवे (2 वर्षे) आणि 12 वर्षांच्या मुलाला हट्टा येथील आरोग्य केंद्रात मृत घोषित करण्यात आले. तर प्रज्ञा साळवे यांना उपचारासाठी परभणी येथे दाखल केले होते. तेथे मृत घोषित करण्यात आले. या अपघातातील इतर तीन ते चार जखमींवर परभणी येथील शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

Back to top button