अयोध्या-मुंबई ‘अमृत भारत’ एक्सप्रेसचा शुभारंभ

पंतप्रधाना मोदीं दाखविली हिरवी झेंडी

* 28 तासांत प्रवास होणार पूर्ण

नवी दिल्ली/28एप्रिल- भारतीय रेल्वेने प्रादेशिक कनेक्टिव्हिटी अधिक बळकट करण्याच्या उद्देशाने अयोध्या ते मुंबई दरम्यान नवीन साप्ताहिक ‘अमृत भारत एक्सप्रेस’ सुरू करण्याची घोषणा केली आहे. उत्तर प्रदेश आणि महाराष्ट्र या दोन राज्यांना मध्य प्रदेशमार्गे जोडणारी ही रेल्वे सेवा सांस्कृतिक आणि व्यावसायिक दृष्ट्या अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी मंगळवारी वाराणसी येथून एका आभासी कार्यक्रमाद्वारे या नवीन रेल्वेला हिरवा कंदिल दाखवला. ही गाडी सुरू झाल्यामुळे अयोध्येतील राम मंदिर दर्शनासाठी जाणारे भाविक आणि नोकरीनिमित्त मुंबईत राहणार्‍या कामगार वर्गाला मोठा दिलासा मिळणार आहे.
अमृत भारत एक्सप्रेस ही प्रामुख्याने आर्थिकदृष्ट्या दुर्बल प्रवाशांचा विचार करून तयार केलेली अत्याधुनिक विना-एसी सेवा आहे. वंदे भारत एक्सप्रेसच्या धर्तीवर या गाडीतील बर्थची रचना करण्यात आली असून प्रवासादरम्यान होणारा थरथराट कमी करण्यासाठी सेमी-ऑटोमॅटिक कपलर तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला आहे. सुरक्षिततेच्या दृष्टीने या गाडीत सीसीटीव्ही कॅमेरे, आणीबाणीच्या वेळी संवाद साधण्यासाठी यंत्रणा, एयरोसोल-आधारित आग प्रतिबंधक प्रणाली आणि क्रॅश-ऑप्टिमाइझ्ड कोच डिझाइनचा समावेश आहे. याव्यतिरिक्त, प्रवाशांच्या सोयीसाठी मोबाइल चार्जिंग पॉईंट्स आणि आधुनिक शौचालये, अधिक क्षमतेची पॅन्ट्री कार आणि दिव्यांग प्रवाशांसाठी विशेष सुविधा देण्यात आल्या आहेत. ही रेल्वे ‘पुश-पुल’ तंत्रज्ञानावर चालते, ज्यामध्ये दोन्ही टोकांना इंजिन असल्याने गाडीचा वेग आणि कार्यक्षमता वाढते.

12 प्रमुख स्थानकांवर थांबणार

नवी रेल्वे सेवा अयोध्येहून मुंबईतील लोकमान्य टिळक टर्मिनसपर्यंतचा प्रवास 28 तासांत पूर्ण करेल. प्रवासादरम्यान ही गाडी सुलतानपूर, प्रतापगड, प्रयागराज, माणिकपूर, सतना, जबलपूर, इटारसी, भुसावळ, जळगाव, नाशिक रोड, कल्याण आणि ठाणे अशा 12 प्रमुख स्थानकांवर थांबणार आहे.

संबंधित बातम्या

Back to top button