कुठे अंगणात तर कुणाच्या घरावर वाळवणे
महिला वर्गाची उन्हाळी कामांसाठी धांदल : तापमान वाढल्याने लगबग

पथ्रोट /10 एप्रिल: गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्याच्या तापमानात वाढ झाली आहे. कडक उन्ह व तापमान वाढल्यामुळे उन्हाळी वाळवणांचा हंगाम सुरू झाला आहे. घरोघरी वर्षभराच्या साठवणीसाठी उन्हाळी पदार्थ करण्यासाठी महिला वर्गाची धांदल उडाली आहे. त्यामुळे कुणाच्या अंगणात तर कुणाच्या घरावर कुरवड्या, सांडगे, शेवळ्या, बोटंय, सरगुंडे, मुंग वड्या, पापडांची वाळवणे पडू लागली आहेत.
मागील काही दिवसांपासून वातावरणात बदल झाला असून तापमानाचा पारा चढू लागला आहे. उन्हाचा चटका वाढला असल्याने उन्हाळी वाळवणांना सुरुवात झाली आहे. बदलत्या जीवनशैलीत आधुनिकतेची झालर चढली असली तरी घरगुती मुंग वड्या, चवीच्या सांडगे, पापड, कुरवड्यांचा गोडवा अद्याप टिकून आहे. त्यामुळे ग्रामीण भागासह शहरातही घरगुती पद्धतीने उन्हाळी कामे केली जातात. मार्च महिन्यात सकाळी गारवा तर दिवसभर कडक उन असते. या कडक उन्हात वाळवलेली वाळवणे वर्षभर सुरक्षित राहतात. चैत्रात पापड व सांडगे करणे निषिद्ध मानले जात असून वैशाख वणण्यात अतिउष्णतेमुळे कुरवड्या, पापड्या मोडतात, अशी धारणा असल्याने त्यापूर्वीच उन्हाळी वाळवणे केली जातात. या पार्श्वभूमीवर सध्या महिला वर्गाची उन्हाळी कामांसाठी लगबग सुरु झाली असून घरोघरी, गच्चीत व इमारतीच्या टेरेसवर कुरवड्या, सांडगे, पापड, फेन्या, वेफर्स वाळताना दिसू लागले आहेत. लवकरच मुलांच्या वार्षिक परीक्षा सुरु होतील व त्यानंतर उन्हाळी सुट्ट्या. मग दिवसभर मुलांचा घरातच गोंधळ गडबड सुरु राहणार असल्याने महिला वर्गाचे काम वाढणार आहे. तसेच सुगीची कामे व ग्रामदैवतांच्या यात्रांचा हंगाम सुरु होत आहे. या पार्श्वभूमीवर महिला वर्गाकडून उन्हाळी कामे आटोपण्यावर भर दिला जात आहे.
हंगामी गृहउद्योगातून अर्थकारणाला बळ-मोठ्या शहरांमध्ये बहुमजली इमारती उभारल्या जात असल्याने अंगणच उरले नाही. तर उन्हाळी वाळवणांसाठी जागाच उरत नाही. चार-सहा मजले वर जाऊन टेरेसवर वाळवण घालण्याचा व्याप नको म्हणून अनेक महिला विविध प्रकारचे तयार पापड, सांडगे, फेण्या, कुरवड्या विकत घेण्याला प्राधान्य देतात. दुसरीकडे उन्हाळी कामे करुन देणारा हंगामी व्यवसाय उदयास आला आहे. यामध्ये बचत गटातील महिला मोठ्या प्रमाणावर कार्यरत आहेत. उन्हाचा चटका वाढल्याने या महिलांचा पापड, कुरवड्यांचा गृहउद्योगही जोमात आला असून कौटुंबिक अर्थकारणाला बळ मिळणार आहे.




