बॉम्बस्फोटाची धमकी देणार्‍या आरोपीस दोन दिवसांची कोठडी

गुन्हे शाखेच्या विशेष पथकाने इंदौरमधून आणले अमरावतीत

आरोपी सोहेल शेख विरुध्द फे्रजरपूर्‍यात गुन्हा दाखल

अमरावती / 30 नोव्हेंबर – शहराला बॉम्बस्फोटाची धमकी देणार्‍या आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे. गुन्हे शाखेच्या पथकाने मध्य प्रदेशातील इंदूर येथून सोहेल पांडुरंग शेखला अटक केली. निरीक्षक संदीप चौहान यांच्या नेतृत्वाखालील विशेष पथकाने जलदगतीने कारवाई करत आरोपीला ताब्यात घेतले आणि अमरावतीला आणले. काही दिवसांपूर्वी बॉम्बच्या धमकीने पोलिस विभाग हादरून गेला होता.
या धमकीला गांभीर्याने घेत, पोलिसांनी तांत्रिक देखरेख, कॉल डिटेल्स आणि लोकेशन ट्रॅकिंगचा वापर करून संशयिताचा माग काढला. इंदूरमध्ये लोकेशन आढळल्यानंतर, गुन्हे शाखेच्या पथकाने तेथे जाऊन त्याला अटक केली. शहर पोलिस सध्या आरोपी सोहेल पांडुरंग शेखची कठोर चौकशी करत आहेत. पोलीस हे शोधण्याचा प्रयत्न करत आहेत की – धमकीचे खरे कारण काय होते? त्यामागे कोणतेही नेटवर्क किंवा संघटना सक्रिय आहे का? शहरात काही मोठा असामाजिक कृत्य करण्याचा कट रचला जात होता का? पोलिसांनी आरोपीचे मोबाईल फोन, चॅट्स, कॉल रेकॉर्ड्स आणि संपर्कांची तपासणी सुरू केली आहे. सुरक्षेच्या कोणत्याही बाबी लक्षात घेऊन पोलिसांनी तपासाला सर्वोच्च प्राधान्य दिले आहे. शहराची सुरक्षा राखता यावी यासाठी कोणत्याही संशयास्पद व्यक्ती किंवा हालचालींबद्दल नागरिकांना तात्काळ पोलिसांना माहिती देण्याचे आवाहन पोलिस विभागाने केले आहे. सदर कारवाई पोलिस आयुक्त अरविंद चावरीया, पोलिस उपायुक्त गणेश शिंदे, पोलिस उपायुक्त श्याम घुगे, पोलिस आयुक्त मुख्यालय तथा गुन्हे रमेश धुमाळ, शिवाजी बजाटे, सहाय्यक पोलिस आयुक्त गुन्हेशाखा यांच्या मार्गदर्शनात गुन्हे शाखेचे पोलिस निरिक्षक संदीप चव्हाण यांच्या नेतृत्वात पोलिस अंमलदार फिरोज खान, सतिश देशमुख, नईम बेग, रणजित गावंडे, प्रभात पोकळे यांनी केली आहे. आरोपीला इंदौर पोलिसांच्या मदतीने शनिवारी त्याला ताब्यात घेण्यात आले होते. त्यानंतर गुन्हे शाखेचे पीआय संदीप चव्हाण यांच्या मार्गदर्शनात पथक इंदौरमध्ये गेले होते, पथकाने रविवारी पहाटे त्याला शहरात आणले आहे. त्याने पोलिसांना सांगितले कि, मी नशेत असताना धमकीचा कॉल केला होता, यावरुन केवळ खोडसाळपणा करणे हाच त्यामागे उद्देश असल्याचे प्रथमदर्शनी समोर येत आहे. मात्र, पोलिसांनी या प्रकरणाचा सखोल तपास सुरू केला आहे. दरम्यान सोहेल शेखविरुध्द फ्रेजरपुरा पोलिसात गंभीर गुन्हे दाखल करण्यात आले असून रविवारी त्याला न्यायालयात हजर केले. न्यायालयाने त्याला दोन डिसेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. या दरम्यान पोलिस त्याचे कोणाकोणासोबत संबध आहे, त्याने का धमकी दिली यासह अन्य प्रश्नांचा उलगडा करण्यासाठी प्रयत्न करणार आहे.

संबंधित बातम्या

Back to top button