पालकमंत्री बानवकुळेंच्या आदेशाने दोन महिन्यांपासून रेती व्यवसाय ठप्प
अनेकांवर बेरोजगारीचे संकट : रेती नसल्याने बांधकाम व्यवसाय पडले ठप्प

वरुड । 23 नोव्हेंबर – गेल्या दोन महिन्यांपासून वरुड व मोर्शी तालुक्यात येणारी मध्यप्रदेशातील रेती बंद झाल्याने परिसरात मोठ्या प्रमाणात बेरोजगारी वाढल्याचे दिसून येत आहे, विशेष म्हणजे रेतीमुळे अनेकांचे बांधकाम स्थगित झाले असून ज्यांनी रेती वाहतुकीसाठी ट्रक खरेदी केले, त्या सुशिक्षित बेरोजगार युवकांवर सुद्धा बेरोजगारीची कुर्हाड निर्माण झाली आहे. ज्यांनी कर्ज घेऊन रेती वाहतुकीसाठी ट्रक विकत घेतले अशा अनेक बेरोजगार तरुणांचे ट्रक सुद्धा मासिक हप्ता न भरल्याने विविध फायनान्स कंपन्यांनी जप्त केल्याने आश्चर्य व्यक्त केला जात आहे. अशातच काही रेती व्यवसायिकांनी जिल्हाधिकारी यांची भेट घेतल्यानंतर त्यांनी हात वरती करीत आपण पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याशी संपर्क साधावा, असा सल्ला दिल्याने या प्रकरणात पुढे काय? असा प्रश्न निर्माण झाला आहे.
सविस्तर माहितीनुसार, गेल्या अनेक वर्षांपासून मध्यप्रदेशातून वरुड आणि मोर्शी तालुक्यात मोठ्या प्रमाणात रेतीची आवक होत असते. याच ठिकाणावरुन अमरावती येथे सुद्धा रेती नेल्या जात होती परंतु पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी जिल्हाधिकार्यांना मध्यप्रदेशातून रेती वाहतूक करु नये, अशा प्रकारचे आदेश दिल्याचे वृत्त येऊन धडकले आणि गेल्या दोन महिन्यांपासून मध्यप्रदेशातून येणारी रेती पूर्णतः बंद झाल्यामुळे बेरोजगारीचे मोठे संकट या परिसरातील नागरिकांवर येऊन ठेपले आहे. एकीकडे शासनाच्या वतीने मोठ्या प्रमाणात घरकुल या परिसरामध्ये देण्यात आले परंतु रेतीची उपलब्धता होत नसल्यामुळे अनेकांची घरकुलची कामे पूर्णतः थकलेली आहेत. एवढेच नव्हे तर अनेक खाजगी बांधकाम सुद्धा रेतीची उपलब्धता होत नसल्यामुळे बांधकाम व्यवसायिकांवर सुद्धा बेरोजगारीचे मोठे संकट निर्माण झाले आहे. वरुड तालुक्यात मोठ्या प्रमाणात बांधकाम सुरू असून रेतीची आवकच बंद झाल्याने गवंडी कामगार आणि बांधकाम व्यवसाय यांचे कामे पूर्णतः बंद असल्याने त्यांचे कुटुंबीय सुद्धा वार्यावर आल्याचे दिसून येत आहे. गेल्या अनेक वर्षांपासून रेतीचा व्यवसाय मोठ्या प्रमाणात वरुड मोर्शी तालुक्यात केला जातो, रेतीच्या व्यवसायातून दोन पैशाची मिळकत होत असल्यामुळे अनेक बेरोजगार तरुण या रेतीच्या व्यवसायामध्ये साम, दाम, दंडाचा वापर करून उतरले आहेत. एकीकडे वरुड तालुक्यात कोणत्याही प्रकारचे कारखाने नसल्यामुळे प्रचंड बेरोजगारी असतांना अनेक बेरोजगार तरुणांनी वेगवेगळ्या फायनान्स कंपन्यांच्या मार्फत कर्ज काढून रेतीसाठी आवश्यक असलेले ट्रक विकत घेतले आणि त्या ट्रकच्या माध्यमातून दोन पैशाची मिळकत मिळवून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह ते करीत होते परंतु पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या आदेशान्वये गेल्या दोन महिन्यांपासून मध्यप्रदेशातून येणारी रेती बंद करण्याचे आदेश जिल्हाधिकार्यांना देण्यात आल्याने जिल्हाधिकार्यांनी त्याची कडक अंमलबजावणी करीत मध्यप्रदेशातून येणारी रेती पूर्णतः बंद केली आहे. वरुड, मोर्शीला येणारी रेती गेल्या दोन महिन्यांपासुन बंद आहे परंतु अमरावती शहराकडे येणारी रेतीची वाहतूक सुरू आहे, हा कसला न्याय? असे सुद्धा बोलले जात आहे. एकीकडे मध्यप्रदेशातील रेती बंद झाल्यामुळे बेरोजगारीचे संकट वरुड व मोर्शी तालुक्यात मोठ्या प्रमाणात वाढले आहे. रेतीच्या व्यवसायाच बंद झाल्यामुळे व त्यातून मिळणारे उत्पन्नच नसल्यामुळे ज्यांनी फायनान्स कंपनीकडून कर्ज घेऊन ट्रक विकत घेतले होते, अशांचे मासिक हप्ते थकल्यामुळे काही फायनान्स कंपन्यांनी ट्रक जप्त करून घेऊन गेल्यामुळे बेरोजगारीचे संकट उभे ठाकले आहे. रेती व्यवसायातून मोठ्या प्रमाणात मिळकत मिळत असल्याचे बोलल्या जात असल्यामुळे राजकीय नेत्यांचे सुद्धा याकडे लक्ष असते. अशातच पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी जिल्हाधिकार्यांना दिलेल्या आदेशामुळे आता पुढे काय? आणखी किती दिवस ही रेती बंद राहणार? हे बेरोजगारीची संकट काय वळण घेणार? कर्ज काढून विकत घेतलेल्या ट्रकचा मासिक हप्ता भरावा तरी कसा? निर्माण झालेले बेरोजगारीचे संकट दुर कसे होणार? यासह अनेक प्रश्न यानिमित्ताने उभे ठाकले आहेत, त्यामुळे पालकमंत्री आणि जिल्हाधिकार्यांनी यासंदर्भात तातडीने निर्णय घेवुन यापुढे निर्माण होणारे महाकाय संकट दूर करावे, अशी मागणी आतासर्वसामान्यांकडून केल्या जात आहे.




