कॅश पळविणार्या 3 अल्पवयीन मुलांना अटक
मुंबईतील एका लॉजवरून तिघांनाही घेतले ताब्यात

अल्पवयीन मुलांनी उधळले मुंबईत पब मध्ये पैसे
नांदगाव पेठ/22 मे: मंगळवार (दि.19) रोजी दुपारच्या सुमारास येथील भारतीय स्टेट बँकेसमोर घडलेल्या तब्बल 3 लाख 14 हजार रुपयांच्या जबरी चोरीच्या गुन्ह्याचा अवघ्या तीन दिवसात छडा लावत पोलिसांनी उल्लेखनीय कामगिरी बजावली आहे. या प्रकरणात 3 विधी संघर्षग्रस्त बालकांना मुंबई येथून ताब्यात घेण्यात आले असून त्यांच्याकडून रोख रक्कम, ओला ई-बाईक व मोबाईल असा एकूण 2 लाख 89 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी अक्षय मोरे रा. बारीपुरा नांदगाव पेठ हे पेट्रोलपंपावर कॅश कलेक्शनचे काम करीत होते. त्यांनी मंगळवारी सावर्डी येथील पेट्रोलपंपावरून 1 लाख 55 हजार 720 रुपये तसेच कोल्हटकर यांच्या डी.के. ट्रॅव्हलिंग पेट्रोलपंपावरून 1 लाख 58 हजार 420 रुपये अशी एकूण 3 लाख 14 हजार 140 रुपयांची रोख रक्कम घेऊन बिझीलँड परिसरातील भारतीय स्टेट बँकेत भरण्यासाठी गेले होते.फिर्यादी यांनी वाहन पार्किंगमध्ये उभे करून ते बँकेकडे जात असताना मागून आलेल्या दोन अनोळखी इसमांनी त्यांना अडवले. आरोपींनी खिशातून घरगुती वापराचा चाकू काढून फिर्यादीवर हल्ला केला. झटापटीत फिर्यादी किरकोळ जखमी झाले. त्यानंतर आरोपींनी त्यांच्या हातातील पैशांची बॅग जबरदस्ती हिसकावून घेतली व तेथून पळ काढला. पळून जाताना आरोपींपैकी एकाने हातातील चाकू घटनास्थळीच फेकून दिला.
घटनास्थळावरून काही अंतरावर निळसर रंगाची इलेक्ट्रिक दुचाकी घेऊन आणखी एक साथीदार उभा होता. त्यावर बसून तिन्ही आरोपी बिझीलँडच्या मुख्य गेटमधून राष्ट्रीय महामार्गाच्या दिशेने पसार झाले. आरोपींनी तोंड बांधले असल्यामुळे त्यांची ओळख पटविणे पोलिसांसमोर मोठे आव्हान होते.या प्रकरणी नांदगाव पेठ पोलीस ठाण्यात अप. क्र. 176/2026 कलम 309(6), 3(5) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता. तपासादरम्यान पोलिसांना तांत्रिक व गोपनीय माहितीच्या आधारे आरोपी मुंबई येथे असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पोलीस निरीक्षक दिनेश दहातोंडे व गुन्हेशाखेचे पोलीस निरीक्षक संदीप चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली संयुक्त पथक तातडीने मुंबईला रवाना करण्यात आले. अथक परिश्रम व शिताफीने पोलिसांनी या गुन्ह्यातील 3 विधी संघर्षग्रस्त बालकांना ताब्यात घेतले. तपासात आरोपी हे रेकॉर्डवरील गुन्हेगार असल्याचे निष्पन्न झाले. त्यांच्याकडून चोरीतील 1 लाख 79 हजार रुपये रोख रक्कम, गुन्ह्यात वापरण्यात आलेली निळ्या रंगाची ओला ई-बाईक क्रमांक चक 27 ऊध 6476 तसेच दोन मोबाईल फोन असा एकूण 2 लाख 89 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.ही कारवाई पोलीस आयुक्त राकेश ओला, पोलीस उपायुक्त रमेश धुमाळ, सहाय्यक पोलीस आयुक्त शिवाजी बचाटे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक दिनेश दहातोंडे, पोउपनि गणेश राऊत, पोलीस कॉन्स्टेबल वैभव तिखिले, राजीक खान, शोएबुद्दीन सैयद, निलेश साविकार, चालक पोहेका वैभव धुरंदर तसेच गुन्हेशाखेचे सपोनि मनीष वाकोडे व पोलीस अंमलदार यांच्या संयुक्त पथकाने पार पाडली.
चोरीच्या पैशातून मुंबईत खरेदी
बँकेसमोरून रोकड लंपास केल्यानंतर आरोपींनी नागपूर व मुंबई येथे पलायन करून क्लब, पबमध्ये मौजमजा करत चोरीच्या रकमेतून मोठ्या प्रमाणात पैसे उधळले. कपडे, बूट व इतर साहित्य खरेदीसह सुमारे 1 लाख 35 हजार रुपये खर्च केल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.आरोपींवर गाडगेनगर पोलीस ठाण्यातही गुन्हा दाखल असून, तिन्ही आरोपींची सध्या कसून चौकशी सुरू आहे.
-दिनेश दहातोंडे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, पो.स्टे. नांदगाव पेठ




