गोपीचंद बाजोरीयांचा अमरावतीतून उमेदवारीचा फार्स केवळ राजकीय दबावासाठी

आ.विप्लव बाजोरिया यांची परभणी-हिंगोली स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून उमेदवारी निश्चित

माजी आ. गोपीकिसन बाजोरिया यांची अकोला-वाशिम-बुलढाणा येथूनच निवडणूक लढण्याची तयारी

अमरावती /22 मे- स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून विधान परिषदेच्या जागेसाठी होणार्‍या निवडणुकीत सध्या अकोल्याशी संबंधित बाजोरिया पिता-पुत्रांची जोडी कमालीची चर्चेत आली आहे.
माजी आमदार गोपीकिसन बाजोरिया हे महायुतीअंतर्गत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या तिकिटावर अमरावती मतदारसंघातून निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहेत, तर दुसरीकडे त्यांचे सुपुत्र आ. विप्लव बाजोरिया हे देखील शिंदे यांच्या शिवसेनेकडूनच हिंगोली-परभणी मतदारसंघातून निवडणुकीची तयारी करत आहेत. परंतु, प्रत्यक्ष जमिनीवरची परिस्थिती पाहता अमरावती मतदारसंघातून भारतीय जनता पक्षाने आणि हिंगोली-परभणी मतदारसंघातून उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने आपले उमेदवार रिंगणात उतरवण्याची जोरदार तयारी सुरू केली आहे. यामुळे बाजोरिया पिता-पुत्रांच्या राजकीय भविष्यावर सध्या तरी मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाल्याचे स्पष्ट दिसत आहे.शिवसेनेशी जुने नाते सांगणारे माजी आ. गोपीकिसन बाजोरिया यांनी यापूर्वी सलग तीन वेळा अकोला- वाशिम-बुलढाणा स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून विधान परिषदेत प्रतिनिधित्व केले आहे. तिन्ही वेळा त्यांनी तत्कालीन भाजप-शिवसेना युतीचे उमेदवार म्हणून दणदणीत विजय मिळवला होता. मात्र, युती तुटल्यानंतर गेल्या निवडणुकीत भाजप उमेदवाराविरुद्ध शिवसेनेकडून लढताना त्यांना पराभवाचा धक्का सहन करावा लागला. या पराभवानंतर त्यांनी वर्ष 2022 मध्ये उद्धव ठाकरेंची शिवसेना सोडून एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला. परंतु, शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केल्यानंतरही अकोल्यातील स्थानिक शहर आणि जिल्हा पदाधिकार्‍यांमध्ये त्यांच्या नेतृत्वाबाबत कमालीचा असंतोष आणि नाराजी पाहायला मिळाली. कदाचित याच अंतर्गत विरोधामुळे माजी आमदार गोपीकिसन बाजोरिया आता स्वतःसाठी नवीन राजकीय अस्तित्वाचा शोध घेत आहेत. याच प्रयत्नातून त्यांनी विधान परिषदेच्या अमरावती जागेवरून निवडणूक लढवण्यासाठी शिंदे यांच्या शिवसेनेकडे आपली प्रबळ दावेदारी सादर केली आहे. इतकेच नव्हे तर गेल्या काही दिवसांत त्यांनी अमरावतीचा दौरा करून येथील विविध राजकीय पक्षांच्या नेत्यांच्या आणि पदाधिकार्‍यांच्या गाठीभेटी घेतल्या आहेत. यामध्ये माजी आमदार बाजोरिया यांनी युवा स्वाभिमान पक्षाचे नेते आ. रवी राणा यांच्याशी घेतलेली भेट सध्या राजकीय वर्तुळात गल्लीबोळापासून ते दिल्लीपर्यंत सर्वात जास्त चर्चेत आहे. दुसरीकडे, माजी आमदार गोपीकिसन बाजोरिया यांचे सुपुत्र आ. विप्लव बाजोरिया हे देखील यापूर्वी परभणी-हिंगोली स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून विधान परिषदेचे सदस्य राहिले आहेत. त्यांनी वर्ष 2018 मधील विधान परिषद निवडणुकीत परभणी-हिंगोली मतदारसंघातून तत्कालीन अखंड शिवसेनेचे उमेदवार म्हणून निवडणूक लढवली होती आणि ते जिंकले होते. ते या वेळीही याच मतदारसंघातून निवडणूक लढवण्याच्या जोरदार तयारीत आहेत. त्यांना शिंदे यांच्या शिवसेनेचे पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून हिंगोली-परभणी जागेसाठी हिरवा कंदील मिळाल्याची माहिती समोर येत आहे. परंतु, गेल्या वेळेसारखाच या वेळीही परभणी-हिंगोली मतदारसंघात आ. विप्लव बाजोरिया यांना ’बाहेरचे उमेदवार’ म्हणून संबोधत त्यांच्या उमेदवारीला स्थानिक पातळीवर कडाडून विरोध केला जात आहे. त्यातच भर म्हणून या वेळी परभणी-हिंगोली विधान परिषद जागेवर अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने आपला अधिकृत दावा ठोकला आहे. यामुळे या जागेवरून महायुतीच्या दोन प्रमुख घटकांमध्ये सध्या मोठा तांत्रिक पेच निर्माण झाला आहे. एकंदरीत शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये झालेल्या मोठ्या फुटीनंतर बाजोरिया पिता-पुत्रांसाठीची राजकीय परिस्थिती आता पूर्णपणे पालटली आहे. यामुळे त्यांच्या राजकीय भवितव्याबाबत राजकीय जाणकारांमध्ये कमालीची अनिश्चितता व्यक्त केली जात आहे.
आ. विप्लव बाजोरिया यांची परभणी-हिंगोली स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून उमेदवारी निश्चित समजल्या जात असून अकोला-वाशिम-बुलढाणा स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून माजी आ. गोपीकिसन बाजोरिया यांना उमेदवारी देण्याची कल सकारात्मक आहे. असे असतांनाही गोपीचंद बाजोरीया अमरावतीमध्ये काँग्रेस पक्षाच्या जेष्ठ नेत्यांशी संपर्क ठेवून आहेत. मध्यंतरी त्यांनी अमरावतीला काही राजकीय नेत्यांच्या भेटी घेतल्या. काँग्रेस पक्षाशी संपर्क केल्यानंतर काँग्रेस नेत्यांनी बाजोरीया यांना स्पष्ट सांगितले की, आम्ही कोणत्याही अपक्ष उमेदवाराला पाठींबा देणार नाही. तुम्ही शिंदे-सेनेतून बाहेर पडा त्यानंतर आम्ही तुमचा काँग्रेस पक्षातर्फे उमेदवारीचा विचार करु शकतो. एका सुत्राने दिलेल्या माहितीनुसार बाजोरीया यांना अकोला-वाशिम-बुलढाणा मतदारसंघात उमेदवारी मिळण्याबाबत साशंकता होती त्यामूळे त्यांनी अमरावतीचा डाव खेळला. परिणामतः अमरावतीची उमेदवारी ही केवळ दबाव गटाचा भाग ठरू शकते.

संबंधित बातम्या

Back to top button