विद्यार्थ्याचा मिनी ट्रकखाली चिरडून मृत्यू

बस डेपो टी-पॉईंटवर भीषण अपघात; परिसरात एकच खळबळ

दर्यापुर /19 नोव्हेंबर – मूर्तिजापूर रोडवरील बस डेपोसमोरील टी पॉइंट परिसरात बुधवारी सकाळी घडलेल्या भीषण अपघातात 14 वर्षीय स्कूली विद्यार्थी शिवराज प्रतीक रोडे याचा मृत्यू झाला. सकाळी सुमारे 8 वाजता घडलेल्या या दुर्घटनेने परिसरात मोठी खळबळ माजली असून स्थानिक नागरिक, शिक्षकवर्ग आणि नातेवाईकांमध्ये शोककळा पसरली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पंजाबराव कॉलनीत राहणारा शिवराज हा एकवीरा विद्यालयात दहावीचा विद्यार्थी होता. दररोजच्या प्रमाणे तो बुधवारी सकाळी त्याचा मित्र शिवम नवलकरसोबत ट्युशनसाठी दुचाकीने निघाला होता. एमएच-30/एडी-4917 क्रमांकाच्या दुपहिया वाहनाचे नियमन शिवम करत होता. दोघेही मूर्तिजापूर रोडवर बस डेपोच्या पुढील टी पॉइंटकडे पोहोचत असताना अचानक ब्रेक दाबल्याने वाहनाचा तोल सुटला आणि दुचाकी रस्त्यावर घसरली. दुचाकीवरील दोघेही विद्यार्थी खाली कोसळले. याचवेळी त्याच मार्गाने एमएच-27/एक्स-1308 क्रमांकाचा टाटा 407 मिनी ट्रक जात होता. दुचाकी घसरल्याने खाली पडलेल्या शिवराजच्या अंगावर ट्रकचे मागील चाक गेले आणि त्याचा जागीच मृत्यू झाला. अपघात इतका अचानक घडला की काही क्षणांसाठी परिसर थिजल्यासारखा झाला. सकाळी नेहमीप्रमाणे वाहतूक सुरू असलेल्या या चौकात लोकांची मोठी गर्दी होती. त्यांच्या डोळ्यासमोर घडलेल्या या घटनेने नागरिक अचंबित झाले. घटनेची माहिती मिळताच दर्यापुर पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. पंचनामा करून मृतदेह उपजिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आला. पोलिसांनी मिनी ट्रक जप्त करून पुढील तपासाला सुरुवात केली आहे. दुचाकीवरील दुसरा विद्यार्थी शिवम नवलकर हा दुर्घटनेत किरकोळ जखमी झाल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. मूलत: सोनखेड-भुईखेड गावचा असलेला शिवराज आपल्या कुटुंबासह दर्यापुरातील पंजाबराव कॉलनीत भाड्याच्या घरात राहत होता. अभ्यासू, शांत स्वभावाचा आणि शाळेत सर्वांचा लाडका असलेला शिवराज ट्युशनसाठी घराबाहेर पडला आणि काही क्षणांतच ही दुर्दैवी घटना घडली. घटनेची माहिती शाळेत पोहोचताच शिक्षक व विद्यार्थ्यांमध्ये हळहळ व्यक्त करण्यात आली. काही पालकांनी रस्त्यावरील वाढत्या वाहतुकीबाबत आणि सुरक्षा उपाययोजनांच्या अभावाबद्दल नाराजीही व्यक्त केली. टी पॉइंट परिसर वाहतुकीच्या दृष्टीने अत्यंत वर्दळीचा असून येथे दररोज मोठ्या प्रमाणात वाहने ये-जा करतात. सकाळच्या गर्दीच्या वेळी वाहतूक नियंत्रणा अभावामुळे अशाप्रकारचे अपघात होण्याची शक्यता अधिक असल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे. या घटनेनंतर परिसरातील नागरिकांनी चौकात सिग्नल किंवा स्पीड ब्रेकर सारख्या उपाययोजना तातडीने करण्याची मागणी केली. दर्यापुर पोलिसांकडून पुढील तपास सुरू असून अपघाताचे नेमके कारण काय, तसेच ट्रकचालकाची भूमिका याबाबत चौकशी सुरू आहे. एका निरागस विद्यार्थ्याचा जीव घेणार्‍या या भीषण दुर्घटनेने संपूर्ण दर्यापुरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

संबंधित बातम्या

Back to top button