मोची गल्ली परिसरात प्लास्टिक जप्ती व डस्टबिन तपासणी विशेष मोहीम
मनपाने ट्रेडर्सला ठोकला 5 हजारांचा दंड

अमरावती/19 मे: महानगरपालिका मध्य झोन क्र.2 राजापेठ अंतर्गत महानगरपालिका आयुक्त वर्षा लड्डा व अतिरिक्त आयुक्त शिल्पा नाईक यांच्या आदेशानुसार तसेच वैद्यकीय अधिकारी (स्वच्छता) डॉ. अजय जाधव आणि सहाय्यक आयुक्त भुषण पुसतकर यांच्या मार्गदर्शनाखाली दिनांक 19 मे 2026 रोजी मोची गल्ली परिसरात प्लास्टिक जप्ती व डस्टबिन तपासणी विशेष मोहीम राबविण्यात आली.
या मोहिमेदरम्यान एकूण 18 आस्थापनांची तपासणी करण्यात आली. तपासणीवेळी अनेक ठिकाणी कापडी व कागदी पिशव्यांचा तसेच 51 मायक्रॉनपेक्षा जास्त जाडीच्या प्लास्टिकचा वापर आढळून आला. मात्र एका आस्थापनामध्ये प्रतिबंधित प्लास्टिकचा वापर आढळून आल्याने ‘साहिल ट्रेडर्स’ या आस्थापनावर 5 हजार रुपयांचा दंड आकारण्यात आला. महानगरपालिकेकडून शहरात स्वच्छता व पर्यावरण संरक्षणाच्या दृष्टीने प्रतिबंधित प्लास्टिकविरोधात सातत्याने कारवाई करण्यात येत असून व्यापार्यांनी शासनाच्या नियमांचे पालन करावे, असे आवाहन महानगरपालिकेने केले आहे.सदर मोहिमेत प्लास्टिक नोडल अधिकारी ए. के. गोहर, ज्येष्ठ स्वास्थ्य निरीक्षक श्रीकांत डवरे, स्वास्थ्य निरीक्षक प्रशांत गावनेर, धनिराम कलोसे, सचिन सैनी, अजिंक्य जवंजाळ, मिथुन वाघमारे, योगेश खंडारे, शक्ती पीवाळ आणि पवन चावरे यांनी सहभाग घेतला.




