पहिल्याच पावसाने ‘इर्विन’रुग्णालयाची दाणादाण
अपघात कक्षात शिरले पाणी, रवी राणांकडून मनपा आयुक्तांना ‘ऑन द स्पॉट’ फोन!

अमरावती/25 जून: शहरात बुधवारी दुपारच्या सुमारास झालेल्या अवघ्या एक तासाच्या मुसळधार पावसाने अमरावती जिल्हा सामान्य रुग्णालयातील (इर्विन) ड्रेनेज सिस्टीम आणि नाल्यांच्या स्वच्छतेची लक्तरे वेशीवर टांगली आहेत. पावसाचे पाणी थेट रुग्णालयाच्या अत्यंत संवेदनशील अशा अपघात कक्षात शिरल्याने संपूर्ण रुग्णालय जलमय झाले होते. या गंभीर परिस्थितीची दखल घेत गुरुवारी आमदार रवी राणा यांनी इर्विन रुग्णालयाला आकस्मिक भेट दिली. यावेळी त्यांनी थेट महानगरपालिका आयुक्त वर्षा लड्डा यांना मोबाईलवर फोन लावून रुग्णालयातील भीषण वास्तवाची जाणीव करून दिली आणि नाल्यांवरील अवैध अतिक्रमणे तात्काळ जमीनदोस्त करण्याचे निर्देश दिले. बुधवारी झालेल्या मुसळधार पावसामुळे इर्विन रुग्णालयाला एखाद्या तळ्याचे स्वरूप आले होते. अपघात कक्षात गुडघाभर पाणी साचल्याने गंभीर रुग्णांवर उपचार करताना डॉक्टर्स आणि परिचारिकांची मोठी तारांबळ उडाली. रुग्णांचे नातेवाईक पाण्यातूनच वाट काढत रुग्णांना सुरक्षित ठिकाणी हलवण्याचा प्रयत्न करत होते. शासकीय यंत्रणेच्या ढिसाळ नियोजनामुळे जिल्हा रुग्णालयाचीच अशी दुरावस्था झाल्याने रुग्णांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. रुग्णालय जलमय झाल्याच्या पार्श्वभूमीवर आमदार रवी राणा यांनी गुरुवारी सकाळी इर्विन रुग्णालयात जाऊन पाहणी केली. त्यांनी जिल्हा शल्य चिकित्सक (सीएस) डॉ. विनोद पवार यांना रुग्णालयात पाणी साचण्याबाबत कडक शब्दांत विचारणा केली. रुग्णालयाच्या परिसरात पाणी तुंबण्यास कारणीभूत असलेल्या व्यवस्थेवर राणांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. दरम्यान उपस्थित चार ते पाच रूग्णांनी आमदार राणांची भेट घेत गैरसोयीबाबत पाढा वाचला. या रूग्णाच्या उपचार आणि सुविधा मिळाव्यात, यासाठी सीएस यांना निर्देश दिले.




