राजेंद्र लॉज दुर्घटना प्रकरणाची सुनावणी सुरू

पाच निष्पाप जीवांच्या मृत्यूस कारणीभूत कोण?

मनपा अधिकारी आणि चालकांवर गंभीर गुन्हे

अमरावती /25 जून- प्रभात टॉकीज जवळील राजेंद्र लॉज इमारत दुर्घटनेत पाच जणांचा बळी गेल्याच्या प्रकरणाला चार वर्षे पूर्ण होत असतानाच, आता पीडितांच्या कुटुंबियांना न्याय मिळण्याची आशा जागृत झाली आहे. 30 ऑक्टोबर 2022 रोजी घडलेल्या या दर्दनाक घटनेनंतर प्रदीर्घ तपास करून कोतवाली पोलिसांनी जिल्हा न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले असून, नियमित सुनावणीचा मार्ग मोकळा झाला आहे.
या दुर्घटनेतील मृत रवींद्र परमार यांच्या पत्नीने न्यायासाठी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठासह राज्य शासनाकडे सातत्याने पाठपुरावा केला, ज्यामुळे या तपासाला गती मिळाली. कोतवाली पोलिसांनी तपास पूर्ण करत 45 साक्षीदारांचे जबाब नोंदवले आहेत. या प्रकरणात हर्षल भरत शहा, सुशीला भरत शहा, अब्दुल साजिद अब्दुल अजीज, राहुल राजेंद्र जैन, विनोद जवाहरलाल बोहरा, मनपा उपअभियंता सुहास चव्हाण आणि सहाय्यक अभियंता अजय विंचुरकर यांच्याविरुद्ध भादंवि कलम 304, 308 व 34 अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. न्यायालयात 45 साक्षीदार आणि विभागीय आयुक्तांचा चौकशी अहवाल मुख्य पुरावा ठरणार आहे, ज्यामध्ये लॉज चालक आणि मनपा अधिकार्‍यांचा गंभीर निष्काळजीपणा उघड झाला होता. या दुर्घटनेत रिजवान शहा शरीफ शहा, मोहम्मद आरिफ शेख रहीम, कमल इकबाल अहमद रहीम, रवींद्र परमार यांचा मृत्यू झाला होता, तर राजेंद्र कदम गंभीर जखमी झाले होते. शहरात आजही अनेक जर्जर इमारतींचा धोका कायम असून मनपाने कडक कारवाई करावी, अशी मागणी अमरावती येथील नागरिकांनी केली आहे.

संबंधित बातम्या

Back to top button