एबी फॉर्मचा थरार; 462 नामांकनांमुळे अंजनगाव सुर्जीचे राजकारण तापले
शिवसेना उबाठा गटाचे शक्ती प्रदर्शन ठळक; काँग्रेस-भाजप-शिंदे गटात मध्यरात्रीपर्यंत हालचाली

अंजनगाव सुर्जी । 17 नोव्हेंबर – नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक 2025 च्या नामांकनाचा शेवटचा दिवस सोमवारी अक्षरशः राजकीय गोंधळात आणि प्रचंड उत्साहात पार पडला. शहरातील सर्व प्रमुख पक्षांनी उमेदवारी अंतिम करण्यासाठी दिवसभर आणि मध्यरात्रीपर्यंत बैठकांचा धडाका लावला. एबी फॉर्म मिळवण्यासाठी उमेदवारांची लगबग, कार्यालयात जमलेली कार्यकर्त्यांची गर्दी, पक्षांतील तणाव, उशिरा रात्री नावे निश्चित होणे आणि पहाटे एबी फॉर्म पोहोचवण्याच्या घटना अशा अनेक नाट्यमय घडामोडींमुळे संपूर्ण शहराचे राजकीय वातावरण तापले.
रविवार आणि सोमवार मिळून एकूण 462 नामांकन दाखल झाल्याने यंदाची निवडणूक अत्यंत चुरशीची होणार आहे, हे स्पष्ट झाले आहे. अखेर फॉर्म दाखल करण्याच्या दिवशी नगराध्यक्ष पदासाठी 14, तर नगरसेवक पदासाठी तब्बल 308 अर्ज दाखल झाले आहेत. नगरपरिषद निवडणुकीत एवढ्या मोठ्या प्रमाणावर अर्ज दाखल झाल्याने आता पक्ष नेतृत्वाची खरी परीक्षा सुरू झाली आहे. कोणत्या वॉर्डात किती उमेदवार माघारी घेतात, नाराजी कशी निवळते, पॅनेल कशी तयार होतात यावरच संपूर्ण लढतीचा पुढील चेहरा अवलंबून आहे. यावेळी अंजनगाव सुर्जीच्या नगरपरिषद निवडणुकीत एबी फॉर्मच्या धांदलीपासून ते शक्ती प्रदर्शनापर्यंत सर्व रंग पाहायला मिळाले. 462 अर्जांच्या आकड्यामुळे, उमेदवारांची मोठी गर्दी आणि पक्षांच्या अंतर्गत घडामोडींमुळे यंदाची निवडणूक ही गेल्या काही वर्षांतील सर्वाधिक रोचक ठरणार आहे. सोमवारी सकाळपर्यंत कोणत्याही पक्षाने अधिकृत एबी फॉर्म देणे सुरू केले नव्हते. त्यामुळे सकाळी नगरपरिषद कार्यालयाबाहेर अर्ज दाखल करणार्या इच्छुकांची मोठी गर्दी उसळली. नगराध्यक्ष पदाचे उमेदवार जाहीर झाल्यानंतर दुपारपासूनच मोठी चहल-पहल वाढली. काही पक्षांमध्ये तर रात्रभर चाललेल्या बैठका, फोन कॉल्स, गटनेत्यांच्या भेटी सुरू राहिल्या. एका राष्ट्रीय पक्षाने तर पहाटे 3 वाजता उमेदवाराच्या घरी थेट एबी फॉर्म पोहोचवला, या घटनेची दिवसभर जोरदार चर्चा झाली. काँग्रेसनेही शेवटच्या क्षणी एबी फॉर्म वाटप केले. ज्या उमेदवारांना तिकीट मिळाले नाही, त्यांचे नाराज चेहरे नगरपरिषद कार्यालयात दिसत होते. काही वॉर्डांमध्ये पक्षांतर्गत असंतोष वाढण्याची चिन्हे दिसत असून पुढील काळात माघारीसाठी मोठा दबाव येण्याची शक्यता आहे. शिवसेना उबाठा गटाने दिवसाची सर्वाधिक दखल घेणारी घटना घडवली. पक्षाने सर्व उमेदवारांना आमदार गजानन लवटे यांच्या कार्यालयात बोलावून एकत्रित एबी फॉर्म वाटप केले. त्यानंतर सर्व उमेदवारांनी गजानन लवटे यांच्या नेतृत्वात पायी मोर्चा काढत नगरपरिषद कार्यालयाकडे कूच केली. ढोल-ताशे, घोषणाबाजी आणि मोठ्या शक्ती प्रदर्शनामुळे शहरात उबाठा गटाचा प्रभाव स्पष्ट दिसला. यावेळी संपर्क प्रमुख सुधीर सुर्यवंशी, आमदार गजानन लवटे, संभाजी ब्रिगेडचे प्रेमकुमार बोके, तालुका प्रमुख कपील देशमुख, बळीराम धर्मे हे प्रमुख उपस्थित होते.भाजपकडून नगराध्यक्ष पदाचे उमेदवार अविनाश गायगोले यांनी स्वतः उपस्थित राहून नगरपरिषद कार्यालयात उमेदवारांचे एबी फॉर्म दाखल केले. भाजपमध्येही इच्छुकांची संख्या मोठी होती, परंतु शेवटी एकसंधतेने उमेदवारी अर्ज दाखल केल्याचे चित्र दिसले. पुरोगामी विचारांचे प्रतिनिधित्व करणारे विनीत डोंगरदिवे यांनी एमआयएमतर्फे नगराध्यक्ष पदासाठी उमेदवारी दाखल केली. त्यांच्या एन्ट्रीमुळे अनेकांचे डोळे विस्फारले असून ही उमेदवारी शहरातील निवडणुकीत अनपेक्षित समीकरण निर्माण करू शकते.
नगरपरिषद उमेदवारांच्या एबी फॉर्म वाटपाचा मोठा थरार पाहायला मिळाला. काही पक्षांनी रात्री उशिरा आणि पहाटेपर्यंत फॉर्म दिल्याने नगरपरिषदेत गर्दी झाली. उबाठा शिवसेनेने आमदार गजानन लवटे यांच्या नेतृत्वात ढोल-ताशांसह शक्ती प्रदर्शन केले. शिंदे गटातून डॉ. स्पृहा डकरे यांनी अर्ज दाखल केला असून आनंदराव अडसूळ उपस्थित राहिले. भाजप उमेदवार अविनाश गायगोले यांनी स्वतः फॉर्म दाखल केला. काँग्रेसने शेवटच्या क्षणी फॉर्म वाटप केले तर काही वॉर्डांत नाराजी दिसली. एमआयएमच्या विनीत डोंगरदिवे यांच्या अनपेक्षित उमेदवारीने नवे समीकरण निर्माण झाले. दोन दिवसांच्या हालचालींनी शहरात उत्साह आणि गोंधळ वाढला असून निवडणूक चुरशीची ठरणार आहे.




