हिंदू स्मशानभूमीतून मृतदेह काढून कब्रस्तानात दफन विधी

अब्दुल रियाजच्या मृतदेहाची ओळख पटल्यानंतर

मृतदेहाची गळा आवळून हत्या करण्यात आल्याचे उघड
नागपुरी गेट पोलीस ठाण्यात हत्येचा गुन्हा दाखल

अमरावती/14 जून- येथील एका बंद रुग्णालयाच्या छतावरील पाण्याच्या टाकीत अत्यंत संशयास्पद आणि गूढ परिस्थितीत एक मृतदेह आढळून आला होता. सुरुवातीला मृतदेहाची ओळख पटू न शकल्यामुळे पोलिसांनी त्याला अज्ञात मानून हिंदू स्मशानभूमीत त्याच्यावर अंत्यसंस्कार केले होते. मात्र, त्यानंतर डीएनए चाचणीचा अहवाल समोर आल्यावर हा मृतदेह अब्दुल रियाज नावाच्या व्यक्तीचा असल्याचे स्पष्ट झाले. हा प्रकार समजताच नातेवाईकांनी मृतदेह परत मिळवण्यासाठी प्रशासनाकडे मागणी केली.
त्यानुसार शुक्रवार रोजी नागपुरी गेट पोलिसांनी सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केली. अधिकार्‍यांच्या उपस्थितीत आणि इन-कॅमेरा चित्रीकरण करून हिंदू स्मशानभूमीतून मृतदेह बाहेर काढण्यात आला. आवश्यक ती कागदपत्रांची पूर्तता झाल्यावर हा मृतदेह नातेवाईकांच्या स्वाधीन करण्यात आला आणि मुस्लिम रीतिरिवाजाप्रमाणे कब्रस्तानात त्याचे पुन्हा दफन करण्यात आले. दरम्यान, शवविच्छेदन अहवालात अब्दुल रियाजची गळा आवळून हत्या करण्यात आल्याचे उघड झाले असून या प्रकरणी नागपुरी गेट पोलीस ठाण्यात हत्येचा गुन्हा दाखल झाला आहे. इतकी गुंतागुंतीची आणि अंगावर काटा आणणारी घटना एका व्यक्तीचे काम असूच शकत नाही, असे पोलिसांचे म्हणणे आहे. मध्यरात्रीच्या वेळी जेव्हा लोकांची ये-जा कमी असते, तेव्हाच आरोपींनी या कृत्याला अंजाम दिला असावा, असा संशय आहे. पुरावा नष्ट करण्याच्या हेतूने मृतदेह बंद रुग्णालयाच्या छतावरील पाण्याच्या टाकीत लपवण्यात आला होता. या मोठ्या कटात नेमके किती लोक सामील होते, हत्या कधी आणि कशी झाली, याचा शोध घेण्यासाठी नागपुरी गेट पोलीस आणि गुन्हे शाखा रात्रीचा दिवस करत आहे. पोलिसांनी मृतकाच्या कुटुंबातील सदस्य आणि मित्रांचे जबाब नोंदवून तपासाचे चक्र वेगाने फिरवणे सुरू केले आहे.

हत्येचे गुढ उकलण्याचे पोलिसांसमोर आव्हान

एका बंद रुग्णालयाच्या छतावरील पाण्याच्या टाकीत मृतदेह लपवून पुरावा नष्ट करण्याचा मोठा प्रयत्न झाला. या क्रूर कटात नेमके किती आरोपी सामील होते आणि मृतदेह छतावर कोणी चढवला, याचा सखोल शोध आता नागपुरी गेट पोलीस आणि गुन्हे शाखा घेत असून संशयितांची कसून चौकशी सुरू आहे.

संबंधित बातम्या

Back to top button