दादासाहेब खापर्डे (एस.सी.पी.) शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था रहाटगावमध्ये प्रवेश प्रक्रियेला सुरुवात

अमरावती/14 जून: कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभाग अंतर्गत दादासाहेब खापर्डे (एस. सी.पी)शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था रहाटगाव मध्ये सत्र 2026-2027 करिता प्रवेश प्रक्रियेला मोठ्या उत्साहात सुरुवात झाली आहे. अतिशय कमी खर्चात कौशल्य प्रदान करून रोजगार व स्वयंरोजगाराच्या उत्तम संधी उपलब्ध करून देणार्‍या या शासकीय संस्थेत जास्तीत जास्त मुला-मुलींनी प्रवेश घ्यावा आणि आपले भविष्य उज्ज्वल करावे, असे आवाहन संस्थेचे प्रभारी प्राचार्य के. के. शिसोदे यांनी केले आहे. यंदा संस्थेमध्ये एकूण नियमित 144 जागांवर प्रवेश दिला जाणार आहे. तसेच 32 जागांवर आय.एम.सी. कोट्यातून प्रवेश देण्यात येईल. यांमध्ये इलेकट्रीशियन, फिटर, मॅकेनिक मोटार व्हीकल , काँप्युटर ऑपरेटर अँड प्रोग्रामिंग असीसस्टंट , फॅशन टेक्नॉलॉजी, फूड प्रोडक्शन असे व्यावसायिक प्रशिक्षण उपलब्ध करण्यात आले आहे. विशेष म्हणजे दहावी उत्तीर्ण असलेले अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकातील 80 टक्के व सामान्य प्रवर्गातील 20 टक्के विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जाणार आहे. इच्छुक उमेदवारांनी आपल्या आधार कार्डवरील नावाच्या नोंदीनुसार admission.dvet.gov.in या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन ऑनलाईन अर्ज भरावा. त्यानंतर आवश्यक कागदपत्रे संस्थेत दाखवून आपला प्रवेश निश्चित करावा. संस्थेतील ठळक वैशिष्ट्ये म्हणजे आय.टीआय.चे रोजगार व व्यवसायाभिमुख प्रशिक्षण घेणार्‍या विद्यार्थ्यांना 100% रोजगार हमीसाठी प्रयत्न करण्यात येतात. नामांकित कंपन्यांच्या माध्यमातून कॅम्पस इंटरव्ह्यूचे आयोजन आणि शिकाऊ उमेदवारी द्वारे नोकरी मिळवून देण्यासाठी विशेष मदत करण्यात येते. त्याचबरोबर अनुभवी व तज्ञ निदेशक वर्ग, अद्ययावत सुसज्ज कर्मशाळा, सुसज्ज वाचनालय व डिजिटल ग्रंथालय सुद्धा उपलब्ध असून प्रशिक्षण कालावधीत कारखान्यांना औद्योगिक भेटी आणि उद्योग क्षेत्रातील तज्ञांचे विशेष मार्गदर्शन दिले जाते. आय.टी.आय.मधील प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर उपलब्ध असणार्‍या विविध रोजगार व स्वयंरोजगाराच्या संधींचा, तसेच राज्य शासनाच्या इतर योजनांचा तरुणांनी मोठ्या संख्येने लाभ घ्यावा.

संबंधित बातम्या

Back to top button