ग्रामीण पोलिसांकडून 210 तक्रारींचा जागेवरच निपटारा

एसपी निकेतन कदम यांचा लोकाभिमुख उपक्रम यशस्वी

 * शेकडो प्रकरणांचा एकाच दिवसात जलद निपटारा

अमरावती/14 जून – ग्रामीण पोलिसांनी राबविलेल्या विशेष मोहिमेला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून एकाच दिवसात 210 तक्रारी जागेवरच मिटविण्यात आल्या आहेत. ग्रामीणचे पोलिस अधीक्षक निकेतन कदम यांच्या संकल्पनेतून जिल्ह्यातील सर्व पोलिस ठाण्यांमध्ये प्रत्येक शनिवारी या उपक्रमाचे आयोजन केले जात आहे. सर्वसामान्यांचे प्रश्न वेळेत सुटावेत आणि पोलिस प्रशासनावरील जनतेचा विश्वास अधिक दृढ व्हावा, हा या मोहिमेचा मुख्य उद्देश आहे. 13 जून रोजी झालेल्या या शिबिरात कौटुंबिक कलह, जमिनीचे वाद आणि आपसी भांडणे मिटवून तक्रारदारांना तातडीने दिलासा देण्यात आला.
पोलिस अधीक्षक निकेतन कदम यांनी स्वतः चांदूर बाजार पोलिस ठाण्याला भेट देऊन गावकर्‍यांशी थेट संवाद साधला आणि त्यांच्या अडीअडचणी जाणून घेतल्या. दुसरीकडे, अतिरिक्त पोलिस अधीक्षक दत्ता टोटेवाड यांनी दर्यापूर पोलिस ठाण्यात उपस्थित राहून एकूण कामकाज आणि तक्रारींचा आढावा घेतला. या मोहिमेत जिल्ह्यातील सर्व उपविभागीय पोलिस अधिकारी आणि ठाणे प्रमुख आपापल्या भागात सक्रिय होते. त्यांनी दोन्ही बाजूंच्या लोकांना समोरासमोर बसवून, त्यांचे म्हणणे ऐकून घेत अनेक जुने वाद सामोपचाराने मिटविले. शनिवारच्या या विशेष मोहिमेत शेतीचे वाद, शेजार्‍यांमधील किरकोळ भांडणे, आर्थिक फसवणूक आणि वाहतुकीशी संबंधित विविध अडचणी नागरिकांनी मांडल्या. ज्या प्रकरणांचा जागेवर निपटारा होऊ शकला नाही, त्यावर पुढील कायदेशीर कारवाई तातडीने सुरू करण्यात आली आहे. ग्रामीण पोलिसांनी जनतेला आवाहन केले आहे की, त्यांनी प्रत्येक शनिवारी जवळच्या पोलिस ठाण्यात जाऊन आपल्या समस्या आणि सूचना मांडव्या. गाव-खेड्यातील जनतेला न्याय मिळवून देण्यासाठी ही मोहीम यापुढेही अधिक प्रभावीपणे राबविली जाणार आहे.

संबंधित बातम्या

Back to top button