धारणीत वाळूची तस्करी ट्रॅक्टर ताब्यात
सहा लाखांवर मुद्देमाल जप्त, दोन संशयितांवर गुन्हा दाखल

अमरावती /17 जून – जिल्ह्यातील धारणी पोलिसांनी अवैध गौण खनिज वाळूची वाहतूक करणार्यांवर मोठी कारवाई करत 6 लाख 58 हजार रुपये किमतीचा ट्रॅक्टर, ट्रॉली आणि वाळू जप्त केली आहे. या प्रकरणी दोन आरोपींविरुद्ध विविध कलमांन्वये गुन्हा दाखल केला आहे.
पोलीस ठाणे प्रभारी अवतार सिंग चव्हाण यांच्या नेतृत्वातील पथकाने 16 जून रोजी गोपनीय माहितीवरून चक्रदा गावाच्या पाट्या रोडवर सापळा रचला होता. यादरम्यान वाळूने भरलेला ट्रॅक्टर-ट्रॉली जप्त करण्यात आला. वाहनाचा चालक संजय बाबुलाल बेठेकर (29) रा. चक्रदा याच्याकडे वाळू वाहतुकीचा परवाना व कागदपत्रे नव्हती. चौकशीत त्याने ट्रॅक्टर मालक रुपाला कासडेकर (45) रा. पोतिलावा, तहसील धारणी च्या सांगण्यावरून वाळू वाहतूक करत असल्याचे सांगितले. पंचनाम्यात 8 हजार रुपयांची वाळू, 5 लाख किमतीचा कुबोटा ट्रॅक्टर (एमएच-27/बीडी-2936) आणि दीड लाखाची विना क्रमांकाची लाल ट्रॉली असा एकूण 6 लाख 58 हजारांचा माल जप्त केला. आरोपींवर भारतीय न्याय संहिता (बीएनएस) कलम 303(2), 3(5), पर्यावरण संरक्षण अधिनियम 1986, सार्वजनिक मालमत्ता हानी निवारण अधिनियम 1984 आणि मोटार वाहन अधिनियमांतर्गत गुन्हा नोंदवला आहे. पुढील तपास पोलीस कर्मचारी मनोज लाधे करत आहेत. ही कारवाई पोलीस अधीक्षक निकेतन कदम, अतिरिक्त पोलीस अधीक्षक दत्ता तोटेवाडे, उपविभागीय पोलीस अधिकारी माधवराव गरुड यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक अवतार सिंग चव्हाण व पथकाने केली. जिल्ह्यात वाळू तस्करी विरोधात मोहीम तीव्र राहणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.




