टिटंबानंतर बीजुधावडी, सावलीखेड्यातील शेकडो विद्यार्थ्यांना अन्नातून विषबाधा
मेळघाटमधील आदिवासी आश्रम शाळांमध्ये गंभीर समस्या चव्हाट्यावर

दोन शाळांमधील 70 पेक्षा अधिक बाधित विद्यार्थी रुग्णालयात
अन्न वितरण यंत्रणेवर पालकांमध्ये प्रचंड संताप
अमरावती /26 जुलै – मेळघाटातील शासकीय आदिवासी आश्रमशाळांमधील विद्यार्थ्यांच्या जेवणाचा प्रश्न पुन्हा गंभीर बनला आहे. टिटंबा येथील आश्रमशाळेत रात्रीचे जेवण घेतल्यानंतर 70 हून अधिक विद्यार्थ्यांना उलटी मळमळ पोटदुखी आणि जुलाबाचा त्रास झाला. त्यानंतर बीजुधावडी येथील 40 ते 50 आणि सावलीखेडा येथील सुमारे 20 विद्यार्थ्यांचीही प्रकृती बिघडली. बाधित विद्यार्थ्यांना धारणीच्या उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. सलग तीन आश्रमशाळांमधील विद्यार्थ्यांची प्रकृती बिघडल्याने केंद्रीय स्वयंपाकघरातून पाठविण्यात येणार्या अन्नाच्या दर्जावर गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत. टिटंबा येथील विद्यार्थ्यांच्या म्हणण्यानुसार रात्रीच्या जेवणातील भोपळ्याची भाजी कच्ची होती आणि तिला वासही येत होता. जेवणानंतर काही वेळातच विद्यार्थ्यांना त्रास सुरू झाला. अन्नाचे नमुने तपासणीसाठी घेण्यात आले असून तपासणीनंतर नेमके कारण स्पष्ट होणार आहे. दरम्यान अन्न तयार झाल्यानंतर आश्रमशाळांपर्यंत पोहोचण्यासाठी 4 ते 5 तास लागतात. त्यामुळे भात कच्चा राहणे वरण पातळ असणे आणि पोळ्या नीट न भाजणे अशा तक्रारी विद्यार्थ्यांकडून होत असल्याचे सांगण्यात येते. घटनेची माहिती मिळताच खा. बळवंत वानखडे यांनी धारणीच्या उपजिल्हा रुग्णालयात जाऊन विद्यार्थ्यांची भेट घेतली. त्यांनी टिटंबा आश्रमशाळेचीही पाहणी केली. दोषी अधिकारी कर्मचारी आणि अन्नपुरवठादारांची चौकशी करून कठोर कारवाई करावी तसेच केंद्रीय स्वयंपाकघराची पद्धत बंद करून आश्रमशाळेतच ताजे आणि गरम जेवण तयार करावे अशी मागणी त्यांनी केली. महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनीही विद्यार्थ्यांच्या उपचाराची माहिती घेतली असून चौकशीच्या सूचना दिल्या आहेत. आज आदिवासी विकास मंत्री डॉ. अशोक उईके यांनी आश्रम शाळेला भेट देत विद्यार्थ्यांना त्रास झाल्याने प्रशासनाला चौकशीचे आदेश दिले आहेत. सहायक जिल्हाधिकारी सिद्धार्थ शुक्ला यांनी बीजुधावडी आणि सावलीखेडा येथे भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली. रुग्णवाहिका औषधे आणि वैद्यकीय पथके तातडीने पाठविण्यात आली. आश्रमशाळांतील गरीब आदिवासी विद्यार्थ्यांच्या आरोग्याशी संबंधित हा गंभीर प्रश्न असल्याने अन्न तयार करण्यापासून ते विद्यार्थ्यांच्या ताटात वाढेपर्यंत संपूर्ण व्यवस्थेची तपासणी करून दोषींवर कारवाई करण्याची मागणी पालकांकडून होत आहे.
मुलांच्या ताटातील अन्नाचा दर्जा तपासा-टिटंबा बीजुधावडी आणि सावलीखेडा येथील घटनांनंतर केंद्रीय स्वयंपाकघराच्या कारभाराची सखोल चौकशी करण्याची मागणी जोर धरत आहे. अन्नाची गुणवत्ता वाहतुकीचा कालावधी स्वच्छता आणि विद्यार्थ्यांच्या तक्रारी याची तपासणी होणे गरजेचे आहे. दोषींवर कारवाई करून आश्रमशाळांमध्येच ताजे आणि गरम जेवण देण्याची व्यवस्था करावी अशी पालकांची मागणी आहे.




