शेकडो ट्रॅक्टरसह बच्चू कडूंचा ताफा नागपूरकडे रवाना
बेलोर्यातून महाएल्गार आंदोलनाची सुरुवात

* राज्यभरातील शेतकरी, दिव्यांग सहभागी, विविध पक्षांचाही पाठिंबा
* 182 किलोमीटरचा टप्पा पूर्ण करुन आज नागपुरात धडक
अमरावती /27 ऑक्टोबर : शेतकर्यांच्या कर्जमुक्तीसाठी, शेतमालाला हमीभाव, तसेच मच्छीमार, शेतमजूर, दिव्यांग आणि मेंढपाळ बांधवांच्या न्याय्य मागण्यांसाठी सुरू झालेल्या महाएल्गार आंदोलनाला आज निर्णायक सुरुवात झाली. बेलोरा (ता. चांदूरबाजार) येथून बच्चू कडू यांच्या नेतृत्वाखाली शेकडो ट्रॅक्टरांचा ताफा नागपूरकडे रवाना झाला. जय जवान, जय किसानच्या घोषणांनी वातावरण भारावून गेले, प्रत्येक ट्रॅक्टरवर आंदोलनाचे झेंडे फडकत होते आणि शेतकर्यांचा आक्रोश रस्त्यांवर ओसंडून वाहत होता.
ताफा रवाना होण्यापूर्वी बच्चू कडू यांनी बेलोरा येथे आई स्व. इंदिराबाई आणि वडील स्व. बाबाराव कडू यांच्या समाधीवर दर्शन घेऊन आशीर्वाद घेतला, मंदिरात पूजन करून आंदोलनाची विधिवत सुरुवात केली. गावातील नागरिक, शेतकरी व महिला वर्गाने मोठ्या संख्येने या ताफ्याला शुभेच्छा दिल्या. सरकारच्या ओशासनांवर नाराजी व्यक्त करत शेतकर्यांनी सातबारा कोरा फसवी ठरल्याचा आरोप केला. अतिवृष्टी, ढगफुटी आणि अवकाळी पावसामुळे नुकसानीचे योग्य नुकसान भरपाई आजपर्यंत शेतकर्यांना मिळालेले नाही. बाजारात शेतमालाचे दर कोसळले असून, हमीभाव केवळ कागदावरच राहिल्याचे शेतकर्यांचे म्हणणे आहे.
कापसावरील आयातशुल्क माफ केल्याने परदेशी कापूस देशात येऊन स्थानिक कापूस उत्पादकांना जबर फटका बसला आहे. सोयाबीनला शासकीय हमीभाव 5330 रुपये असला तरी प्रत्यक्षात फक्त 3000 रुपये मिळत आहेत. मेंढपाळ व मच्छीमार बांधवही मैदानात उतरले असून, मराठवाडा आणि विदर्भातील मेंढपाळ आपल्या जनावरांसह नागपूरकडे निघाले आहेत. “आमचं पोट शेतावर अवलंबून आहे आणि शासनाचं धोरण आमच्या विरोधात आहे,” अशी त्यांची ठाम भूमिका आहे. त्यांच्या सहभागाने आंदोलनाला ग्रामीण जनजीवनाचा आत्मीय स्पर्श मिळाला आहे.
सरकारच्या दुर्लक्षामुळे शेतकर्यांची आरपारची भूमिका ठळक झाली असून, बच्चू कडू आणि त्यांच्या समर्थकांनी आता आरपारच्या लढाईसाठी सज्जता घेतली आहे. नागपूरमध्ये होणाऱ्या या महाएल्गार आंदोलनाला राज्यातील विविध शेतकरी संघटनांचा उत्स्फूर्त पाठिंबा मिळत आहे. हा एल्गार फक्त आंदोलन नाही, तर शेतकर्यांच्या अस्तित्वाचा प्रश्न आहे, अशी भावना शेतकर्यांमध्ये दिसून येते.काँग्रेसनेही आंदोलनाला पाठिंबा दिला असून, प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी पत्रकाद्वारे बच्चू कडूंच्या आंदोलनाला समर्थन जाहीर केले. त्यानंतर बच्चू कडू यांनी भ्रमणध्वनीवरून सपकाळ यांच्याशी संवाद साधत आभार मानले आणि शेतकरी लढ्यात सहभागी होण्याचे आवाहन केले.
* काँग्रेसचा पाठिंबा –महाएल्गार आंदोलनाला संपूर्ण महाराष्ट्रातील शेतकरी संघटनांचा उत्स्फूर्त पाठिंबा मिळत असून, काँग्रेस पक्षानेही या आंदोलनाला अधिकृत पाठिंबा दिला आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी पत्रकाद्वारे पाठिंबा जाहीर केला. त्यानंतर बच्चू कडू यांनी भ्रमणध्वनीवरून सपकाळ यांचे आभार मानले आणि आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन केले.
* ही शेतकर्यांच्या अस्तित्वाची लढाई – बच्चू कडू- यावेळी प्रसारमाध्यमांशी बोलताना बच्चू कडू म्हणाले की, हा केवळ मोर्चा नाही, तर शेतकर्यांच्या अस्तित्वाची लढाई आहे. आमच्या पिढ्यांना जगायचे असेल, तर ही आरपारची लढाई लढायलाच हवी. शासनाच्या घोषणांवर शेतकर्यांचा विश्वास संपला असून, आता आमचा तिरंगा हा आमचा आवाज बनला आहे. आम्ही शांततेत पण ठामपणे आमचे हक्क मागत आहोत आणि ही लढाई शेवटपर्यंत लढली जाईल.




