प्रबळ व सर्वसमावेशक असा निवडून येणारा उमेदवार निश्चित करावा
आ.संजय खोडके यांचा कार्यकर्त्यांशी संवाद

* स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणूक पार्श्वभूमीवर मंथन
अमरावती/26 ऑक्टोबर – महाराष्ट्र विधानसभेची निवडणूक आपण महायुती म्हणून लढलो असलो तरी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसंदर्भातील परिस्थिती वेगळी आहे. अमरावती जिल्ह्यात आगामी निवडणुकांचे वेळापत्रक स्पष्ट झाले असून कमी कालावधी शिल्लक आहे. या निवडणुकांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला नवी ताकद आणि बळ द्यायचे आहे. त्यामुळे आतापासूनच जोमाने तयारीला लागून निवडणुका जिंकायच्या आहेत. कुठल्या जागांवर स्वबळावर लढायचे, कुठे युती करायची किंवा मैत्रीपूर्ण लढत द्यायची, यासंदर्भात स्थानिक परिस्थिती लक्षात घेऊन निर्णय घेणे आवश्यक आहे. ही जबाबदारी स्थानिक नेतृत्वाने घेत एक प्रबळ, सक्षम आणि सर्वसमावेशक असा उमेदवार निश्चित करावा, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे संघटक महासचिव आमदार संजय खोडके यांनी केले.
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पूर्वतयारीच्या अनुषंगाने पश्चिम विदर्भाच्या दौर्यावर असलेले आमदार संजय खोडके यांच्या अध्यक्षतेखाली रविवार, 26 ऑक्टोबर 2025 रोजी अमरावती जिल्हा ग्रामीण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत मार्गदर्शन करताना आमदार संजय खोडके म्हणाले की, अमरावती जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची विचारधारा मानणारा आणि राष्ट्रीय अध्यक्ष तसेच राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या नेतृत्वावर विश्वास दाखविणारा मोठा जनाधार आहे. मात्र, या जनाधाराचे रूपांतर मतांमध्ये होत नाही. याचे कारण म्हणजे आपल्याकडे प्रबळ, सक्षम आणि बलाढ्य उमेदवारांचा अभाव आहे, ज्यामुळे पक्ष कधीही सात ते दहा जागांच्या पुढे पोहोचलेला नाही.
आता कार्यकर्त्यांनी एकजूट होऊन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला बळ द्यायचे आहे. आगामी निवडणुकांमध्ये इच्छुक आणि प्रबळ दावेदार असणारे उमेदवार शोधणे आवश्यक आहे. सर्व तालुका प्रमुख आणि पदाधिकाऱ्यांनी आपल्या सर्कल अथवा गणचा बारकाईने आढावा घेतल्यास उमेदवार निश्चित करणे सोपे जाईल. काही ठिकाणी पक्ष मजबूत आहे, तर काही ठिकाणी तुल्यबळ लढत अपेक्षित आहे. मात्र, या निवडणुकीत पक्षाची कामगिरी सुधारण्याचा निर्धार आवश्यक आहे, असे सांगून आमदार खोडके यांनी ग्रामीण कार्यकर्त्यांमध्ये नवा उत्साह निर्माण केला.
या बैठकीत आमदार खोडके यांनी अमरावती जिल्हा परिषदेच्या 59 सर्कल, 11 नगरपालिकां आणि 118 पंचायत समिती गणांचा सविस्तर आढावा घेतला. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महिला पदाधिकारी सुरेखाताई ठाकरे यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस निर्णायक भूमिका बजावणार असून आपल्या शिवाय सत्ता स्थापन होणार नाही. त्यामुळे पक्षाने स्थानिक उमेदवारांना बळ द्यावे, अशी विनंती त्यांनी केली. बैठकीच्या प्रारंभी जिल्हाध्यक्ष संतोष महात्मे यांनी अमरावती ग्रामीण भागातील कार्यकर्त्यांमधील संभ्रम दूर करून पक्ष विजयी होण्यासाठी सज्ज असल्याचे आणि पोषक वातावरण निर्माण झाल्याचे सांगितले. या बैठकीला राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हा ग्रामीणचे पदाधिकारी, तालुकाध्यक्ष, माजी नगराध्यक्ष, जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्य तसेच कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
* प्रत्येक आव्हानांना सामोरे जाऊन निवडणुका जिंकायच्या आहेत – आ.सुलभाताई खोडके
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी जिल्हा ग्रामीणच्या बैठकीला उपस्थित अमरावती विधानसभा मतदारसंघाच्या आमदार सुलभाताई खोडके यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की, निवडणुका या खऱ्या अर्थाने निवडणुकांसारख्याच झाल्या पाहिजेत आणि आपल्याला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची ताकद वाढवायची आहे. निवडणुकांसाठी साधारणतः एक ते दीड महिना अवधी हाती असल्याने, आपण युती करायची की नाही, आपल्या समोर कोणत्या बलाढ्य पक्षाचे आव्हान आहे, किंवा त्यांच्या विरोधात आपण तग धरू शकतो का अशा विचारात किंवा संभ्रमात कार्यकर्त्यांनी पडू नये. महाराष्ट्राच्या विधानसभेच्या निवडणुकीत आपण महायुती म्हणून एकत्र काम केले असले तरी आता स्थानिक निवडणुकांमध्ये एकमेकांसमोर उभे ठाकलो आहोत, हे वास्तव मान्य करावे आणि आत्मविश्वासाने पुढे जावे. निवडणुकीत विरोधकांचे आव्हान निश्चितच असेल; कुणी साम, दाम, दंड, भेद वापरून गोंधळ घालण्याचा प्रयत्न करेल, परंतु कार्यकर्त्यांनी न डगमगता आणि मोठ्या हिमतीने या निवडणुकांना सामोरे जावे, असे आवाहन ज्येष्ठ नेत्या आमदार सुलभा खोडके यांनी केले.




