अमरावती विदर्भातील सर्वाधिक उष्ण शहर; तापमान 46.6 अंशावर
अकोल्याचा विक्रम मोडीत काढत अमरावती अव्वल

अमरावती/27एप्रिल- विदर्भाच्या मातीत जणू सूर्याने अग्नीतांडव सुरू केले असून अमरावतीने उष्णतेच्या बाबतीत आज संपूर्ण प्रांताला मागे टाकले आहे. मागील दोन दिवसांपासून अकोला शहर तापमानात आघाडीवर असताना आज अमरावतीने 46.6 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद करत अकोल्याचा विक्रम धुळीस मिळवला आहे. ही केवळ आकडेवारी नसून अमरावतीकरांच्या अंगाची होणारी लाहीलाही आहे. संपूर्ण जिल्ह्यात दुपारच्या वेळी रस्ते स्मशानशांततेचा अनुभव देत असून उन्हाच्या जीवघेण्या झळांमुळे नागरिकांनी उंबरठ्याच्या आत राहणेच पसंत केले आहे. हवामान विभागाच्या माहितीनुसार यंदा एप्रिल महिन्यातच तापमानाने धोक्याची पातळी ओलांडली असून येत्या काळात ही उष्णतेची लाट अधिक रौद्र रूप धारण करण्याची शक्यता निर्माण झाली आहे. अमरावती शहर आज विदर्भातील सर्वात तप्त शहर म्हणून नोंदवले गेल्याने सर्वत्र मोठी खळबळ माजली आहे. विदर्भातील इतर शहरांमध्येही सूर्यनारायणाने आग ओकणे सुरूच ठेवले असून वर्धा 46.5, अकोला 46.3 आणि चंद्रपूरमध्ये 45.2 अंश सेल्सिअस इतकी भयानक तापमानाची नोंद झाली आहे. एल निनोचा वाढता प्रभाव आणि पश्चिमेकडून येणारे धगधगते वारे यामुळे उष्णतेत अतोनात वाढ झाली असून शहरांमधील सिमेंटचे रस्ते आणि होत असलेली वृक्षतोड यामुळे सामान्य नागरिक जिवंतपणी नरकयातना भोगत आहेत. वाढत्या उष्म्यामुळे दुपारच्या सुमारास बाजारपेठांमध्ये शुकशुकाट पसरला असून जिल्ह्यामध्ये जणू काही अघोषित संचारबंदी लागू झाली आहे की काय असे भयानक चित्र दिसत आहे. वाढत्या उष्णतेमुळे उष्माघाताचा धोका वाढला असून नागरिकांनी डोक्याला रुमाल बांधल्याशिवाय घराबाहेर पडू नये असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे. ग्रामीण भागातही उन्हाचा चटका इतका तीव्र आहे की शेतकरी आणि शेतमजुरांना आपली कामे अर्ध्यावर सोडावी लागत आहेत.
उष्णतेच्या या लाटेमुळे केवळ माणसेच नव्हे तर मुक्या प्राण्यांचे देखील प्रचंड हाल होत असून पाण्याचे साठे कोरडे पडल्याने वन्यजीव पाण्याच्या शोधात गावांकडे धाव घेत आहेत. हवामान खात्याने दिलेल्या इशार्यानुसार पुढील 48 तास विदर्भासाठी अत्यंत महत्त्वाचे असून तापमानाचा हा चढता पारा आणखी नवे विक्रम प्रस्थापित करण्याची भीती आहे. यंदा एप्रिलमध्येच तापमान 46 अंशांच्या पार गेल्याने आगामी मे महिन्यातील भीषणतेची कल्पना करूनच नागरिकांच्या अंगाचा थरकाप उडत आहे. उन्हापासून बचाव करण्यासाठी जास्तीत जास्त पाण्याचे सेवन करावे आणि अत्यंत गरज असल्यास घराबाहेर पडावे असा सल्ला आरोग्य तज्ज्ञांनी दिला आहे. अमरावती जिल्ह्याची ही विदर्भातील सर्वोच्च नोंद पर्यावरणाच्या र्हासाची धोक्याची घंटा असून प्रशासकीय यंत्रणा या नैसर्गिक आपत्तीसमोर हतबल होताना दिसत आहे. दुपारच्या वेळी रस्ते ओस पडल्याने जनजीवन पूर्णपणे कोलमडले असून विदर्भाची ही भूमी सध्या जणू धगधगती भट्टी बनली आहे. विदर्भातील अमरावती, अकोला, वर्धा, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली, यवतमाळ आणि वाशिम या सर्वच जिल्ह्यांमध्ये उष्णतेचा हाहाकार असून पारा 40 अंशांच्या खाली येण्याचे नाव घेत नाहीये. संपूर्ण विदर्भातील जनजीवन या उष्णतेच्या लाटेमुळे विस्कळीत झाले असून निसर्गाच्या या प्रकोपापुढे मानवी शक्ती तोकडी पडताना दिसत आहे. पुढील काही दिवस ही स्थिती अशीच राहण्याची शक्यता असल्याने नागरिकांनी स्वतःची आणि आपल्या कुटुंबाची विशेष काळजी घेणे अनिवार्य झाले आहे. सिमेंटचे रस्ते, वाढते नागरीकरण आणि झाडांची होत असलेली कत्तल यामुळे शहरांमधील उष्णता अधिकच वाढत चालली आहे.
निसर्ग जपल्यास मिळेल थंड हवा-निसर्गाचा समतोल बिघडल्याने आज मानवावर ही वेळ आली आहे. जर आपण आताच सावध होऊन वृक्षारोपण आणि पाण्याचे संवर्धन केले नाही तर भविष्यात हा सूर्य अधिक आक्रमक होईल. पर्यावरण वाचवणे हाच एकमेव पर्याय आहे.ेईपर्यंत संबंधित ठेकेदाराचे सर्व बिल तात्काळ थांबवण्यात यावे. मजुरांच्या हितासाठी करण्यात आलेल्या या मागणीमुळे स्थानिक स्तरावर चर्चेला उधाण आले असून प्रशासन या प्रकरणात काय निर्णय घेते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
उष्णतेचा कहर : राज्यात 8 बळी
राज्यात उन्हाच्या भीषण लाटेने आतापर्यंत आठ जणांचा बळी घेतला आहे. यामध्ये परभणी, नागपूर, हिंगोली, लातूर, अकोला, वाशिम, बुलढाणा आणि अहिल्यानगर येथील नागरिकांचा समावेश आहे. 25 एप्रिलपर्यंत उन्हामुळे 39 रुग्ण गंभीर आजारी पडले असून, वाढत्या तापमानामुळे प्रशासनाने दुपारी घराबाहेर न पडण्याचे आवाहन केले आहे.



