अमरावती महापौरांची तत्परता : सायन्सस्कोर मैदानावर उभारली जाणार अत्याधुनिक स्वच्छतागृहे

जिल्हा परिषद प्रशासनासोबत चचा

अमरावती/21एप्रिल: शहराचे प्रथम नागरिक, महापौर श्रीचंद तेजवानी यांनी आज पुन्हा एकदा आपल्या कार्यतत्परतेचा प्रत्यय दिला आहे. दिनांक 20 एप्रिल 2026 रोजी सकाळी, महापौरांनी बसस्थानक परिसरातील सायन्सस्कोर मैदानावर भेट दिली असता, नागरिकांनी मांडलेल्या समस्यांची दखल घेत त्यांनी तातडीने तेथे स्वच्छतागृहे आणि स्नानगृहे उभारण्याचे निर्देश प्रशासनाला दिले आहेत.
दररोज सकाळी आरोग्याप्रती जागरूक नागरिक मोठ्या संख्येने सायन्सस्कोर मैदानावर ’मॉर्निंग वॉक’ साठी येत असतात. यावेळी नागरिकांनी महापौरांची भेट घेऊन मैदानावर असलेल्या मूलभूत सुविधांच्या अभावाकडे त्यांचे लक्ष वेधले. विशेषतः मैदानावर सध्या सुरू असलेल्या विविध उत्सवांमुळे आणि मेळाव्यामुळे तेथे दुकानांची मोठी गर्दी असते. मात्र, परिसरात कायमस्वरूपी स्वच्छतागृह नसल्यामुळे महिला, पुरुष नागरिक आणि व्यापार्‍यांची मोठी गैरसोय होत होती. ही बाब लक्षात येताच महापौरांनी यावर तात्काळ तोडगा काढण्याचे आश्वासन दिले.
स्वच्छतेचा मुद्दा गांभीर्याने घेत महापौर श्रीचंद तेजवानी यांनी जिल्हा परिषद ऑफिस मध्ये हा मुद्दा मांडला असता, त्या विषयी सकारात्मक चर्चा झाली असून, या ठिकाणी महिला आणि पुरुषांसाठी स्वतंत्र आणि सुसज्ज स्वच्छतागृहे बांधण्याचे निर्देश दिले. बाहेरगावाहून येणार्‍या नागरिकांची सोय व्हावी, या उद्देशाने 5 आधुनिक स्नानगृहे उभारण्याच्या सूचनाही त्यांनी केल्या. केवळ आश्वासन न देता महापौरांनी प्रत्यक्ष कार्यवाहीला सुरुवात केली आहे. सदर जागा जिल्हा परिषदेच्या अखत्यारीत येत असल्याने, तेथे शौचालय बांधकामासाठी आवश्यक असलेल्या प्रक्रियेसाठी महापौरांनी जिल्हा परिषद प्रशासनाशी पत्रव्यवहार सुरू केला आहे. महापौरांच्या या निर्णयामुळे दररोज फिरायला येणार्‍या नागरिकांची, मेळाव्यातील दुकानदारांची आणि विशेषतः महिलांची मोठी अडचण दूर होणार आहे. महापौरांनी दाखवलेल्या या संवेदनशीलतेमुळे आणि तत्परतेमुळे अमरावतीकर नागरिकांमधून त्यांचे विशेष कौतुक होत आहे. स्वच्छ आणि सुंदर अमरावतीसाठी महापौरांचे हे महत्वाचे पाऊल ठरणार आहे. यावेळी जिल्हा परिषद चे मुख्य कार्यकारी अधिकारी सत्यम गांधी, नगरसेविका सुरेखा लुंगारे उपस्थित होते.

संबंधित बातम्या

Back to top button