काटकुंभ ग्रामपंचायतीच्या दुर्लक्षामुळे आरोग्य धोक्यात

मच्छी-मटण मार्केटमध्ये घाणीचे साम्राज्य; नागरिकांमध्ये संतापाची लाट

चिखलदरा/12 जानेवारी – काटकुभ ग्रामपंचायत हद्दीतील गंभीर अस्वच्छतेमुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला असून ग्रामपंचायत प्रशासनाच्या ढिसाळ कारभारामुळे गावात सर्वत्र घाणीचे साम्राज्य पसरले आहे.
विशेषतः मच्छी व मटण मार्केट परिसरात सडलेले मटण, मच्छीचे अवशेष व कोंबडीचे कच्चे पंख उघड्यावर फेकले जात असल्याने दुर्गंधी, किडे व माशांचा प्रचंड उपद्रव वाढला आहे. दर गुरुवारी बाजाराच्या दिवशी कोंबडी कापल्यानंतर उरलेला कचरा रस्त्यावर व मोकळ्या जागेत टाकला जात असल्याचे चित्र असून त्या ठिकाणी किडे फिरताना दिसत आहेत. यामुळे डेंग्यू, मलेरिया, विषाणूजन्य आजार पसरण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. लहान मुले, वृद्ध व महिला यांना याचा मोठा फटका बसण्याची भीती नागरिक व्यक्त करीत आहेत. काटकुभ ग्रामपंचायत सचिव व सरपंचा यांच्या दुर्लक्षामुळे ही परिस्थिती दिवसेंदिवस अधिकच गंभीर होत असून वारंवार तक्रारी करूनही कोणतीही ठोस कारवाई करण्यात आलेली नाही. कचरा उचल, नियमित स्वच्छता, जंतुनाशक फवारणी याकडे पूर्णतः दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे. शासनाच्या स्वच्छ भारत अभियानाची येथे अक्षरशः फज्जा उडाल्याचे चित्र असून ग्रामपंचायत प्रशासन केवळ कागदोपत्री स्वच्छतेचे अहवाल सादर करत असल्याची संतप्त प्रतिक्रिया नागरिकांमधून उमटत आहे. या प्रकरणाची तात्काळ दखल घेऊन संबंधित विभागाने मच्छी व मटण मार्केटची नियमित स्वच्छता करावी, उघड्यावर कचरा टाकणार्‍यांवर कारवाई करावी तसेच आरोग्य विभागामार्फत तातडीने तपासणी व फवारणी करावी, अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे. अन्यथा नागरिक आंदोलनाचा इशारा देत आहेत.

Back to top button