मी तुमची अनेक प्रकरणे पाहिली आहेत

CJI गवईंनी ईडीला फटकारले

नवी दिल्ली/14 ऑक्टोबर -: तमिळनाडू स्टेट मार्केटिंग कॉर्पोरेशनमधील 1000 कोटी रुपयांच्या घोटाळा प्रकरणावर सर्वोच्च न्यायालयाने 14 ऑक्टोबर रोजी प्रवर्तन संचालनालयाला (ईडी) तीव्र शब्दांत फटकारले. मुख्य न्यायाधीश भूषण रामकृष्ण गवई यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाने ईडीला थेट प्रश्न केला की, “राज्यातील पोलिस या प्रकरणाचा तपास करू शकतात, तर ईडीने हस्तक्षेप करण्याची गरज काय होती? हे राज्याच्या अधिकारक्षेत्रावर अतिक्रमण नाही का?” सुनावणी सीजेआय गवई आणि न्यायमूर्ती विनोद चंद्रन यांच्या खंडपीठासमोर झाली. ईडीने मार्च 2025 मध्ये T-SMC चेन्नई मुख्यालयावर छापे टाकले होते आणि या कारवाईदरम्यान संगणक व इतर दस्तऐवज जप्त केले होते. एजन्सीने या प्रकरणात दारुच्या किमतीत फेरफार, टेंडर प्रक्रियेत गैरव्यवहार आणि लाचखोरी केल्याचा आरोप केला होता. सुनावणीदरम्यान न्यायालयाने विचारले की, “राज्य पोलिस या प्रकरणाची चौकशी करू शकले नसते का? ईडीला हस्तक्षेप का करावे लागले? राज्यात कायदा व सुव्यवस्था कोण राखतो? यामुळे देशाच्या संघीय रचनेवर काय परिणाम होईल?” मुख्य न्यायाधीश गवई यांनी यावर टिप्पणी करताना सांगितले की, “गेल्या सहा वर्षांत मी ईडीच्या तपासाची अनेक प्रकरणे पाहिली आहेत, पण त्यावर बोललो, तर उद्या ते सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनेल.” यावर ईडीचे पक्ष मांडणारे अतिरिक्त सॉलिसिटर जनरल एस. व्ही. राजू म्हणाले की, “महोदय, सोशल मीडियावर आमच्या बाजूने कोणी बोलतच नाही, हाच आमचा खरा आक्षेप आहे.”

संबंधित बातम्या

Back to top button