चांदूर रेल्वेत कोट्यवधींचा गुटखा जप्त, नाकाबंदीत वाहन ताब्यात

चांदूर रेल्वे/12 मे – अमरावती ग्रामीण पोलिसांनी अवैध गुटखा तस्करीविरोधात मोठी कारवाई करत तब्बल एक कोटी एक लाख पंचेचाळीस हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. चांदूर रेल्वे पोलिसांनी गुप्त माहितीच्या आधारे नाकाबंदी करून मालवाहू वाहन अडवत दहा टन अवैध गुटखा पकडला. या कारवाईमुळे गुटखा तस्करांचे जाळे उघडकीस येण्याची शक्यता निर्माण झाली असून परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.
अमरावती ग्रामीण पोलीस अधीक्षक विक्रांत देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. 12 मे रोजी पोलिसांना अवैध गुटखा वाहतुकीची माहिती मिळाल्यानंतर चांदूर रेल्वे पोलिसांनी तत्काळ नाकाबंदी केली. यावेळी एमएच 01 सीव्ही 4962 क्रमांकाचे मालवाहू वाहन संशयावरून थांबवण्यात आले. वाहनाची तपासणी केली असता त्यामध्ये मोठ्या प्रमाणावर गुटखा साठा आढळून आला.
पोलिसांनी दहा टन गुटखा अंदाजे पंच्याहत्तर लाख पंच्याहत्तर हजार रुपये किंमतीचा जप्त केला. त्यासोबत पंचवीस लाख रुपये किंमतीचे मालवाहू वाहन तसेच साठ हजार रुपये किंमतीचे दोन भ्रमणध्वनी संच ताब्यात घेतले. एकूण एक कोटी एक लाख पंचेचाळीस हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
या प्रकरणी वाहन चालक शेख इमरान शेख इंसान वय 36 रा. अमरावती याला ताब्यात घेण्यात आले असून इतर आरोपी फरार असल्याची माहिती पोलिसांनी दिली. आरोपींविरुद्ध गुन्हा नोंदवून पुढील तपास चांदूर रेल्वे पोलीस करीत आहेत. या कारवाईत अचलपूर विभागीय पोलीस अधिकारी अनिल ठाकरे पोलीस निरीक्षक अशोक आवारे यांच्यासह पोलीस पथकाने महत्त्वाची भूमिका बजावली.

गुटखा तस्करांचे जाळे उघड

चांदूर रेल्वे पोलिसांच्या कारवाईनंतर अवैध गुटखा पुरवठ्यामागील मोठे रॅकेट समोर येण्याची शक्यता व्यक्त होत आहे. फरार आरोपींचा शोध सुरू असून पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवली आहेत.

संबंधित बातम्या

Back to top button