अखेर मेडिकल कॉलेज अलियाबादलाच
‘आयडेंटिफाईड फॉरेस्ट’ जागा अनारक्षित करण्याची प्रक्रिया सुरू

403 कोटींच्या बांधकाम कामाला लवकरच सुरुवात – आ. रवी राणा यांचा दावा
अमरावती/12 मे: अमरावती येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयासाठी निश्चित करण्यात आलेली कोंडेश्वर-अलियाबाद येथील जागा ’आयडेंटिफाईड फॉरेस्ट’ (ओळखले गेलेले वनक्षेत्र) या प्रकारात मोडत असल्याचे वनविभागाच्या लक्षात आले होते. यामुळे निर्माण झालेल्या वादावर आता तोडगा निघाला असून, सदर जमीन अनारक्षित करण्यासाठी शासनाने उपवनसंरक्षकांना आदेश दिले आहेत. कोंडेश्वर-अलियाबाद येथील महसूल विभागाच्या गट नं. 9/1 मधील 11.29 हेक्टर क्षेत्र वैद्यकीय महाविद्यालयासाठी संपादित करण्यात आले होते. दरम्यान, या प्रकल्पाला आर्थिक साहाय्य करणार्या संस्थेने जागेची तपासणी केली असता, ही जागा वनविभागाच्या ’आयडेंटिफाईड फॉरेस्ट’ प्रवर्गात असल्याचे उघड झाले. वनविभागाच्या उपवनसंरक्षकांनी पत्राद्वारे ही माहिती दिल्यानंतर राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली होती.
’मंडळ मीडिया हाऊस’ला दिलेल्या खास मुलाखतीत विधान परिषद सदस्य आ. संजय खोडके यांनी ही जागा वादग्रस्त ठरल्यामुळे वैद्यकीय महाविद्यालय अमरावती शहरातच व्हावे, असा आग्रह धरला होता. त्यानंतर अनेक नेत्यांनी महाविद्यालयाच्या जागेबाबत आपापली मते मांडली. अचलपूरचे आमदार प्रवीण तायडे यांनी हे महाविद्यालय अचलपूरला व्हावे, अशी भूमिका घेतली होती. यामुळे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय नेमके कुठे होणार, याबाबत संभ्रम निर्माण झाला होता. अखेर वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभागाच्या दि. 7 मे 2026 रोजीच्या पत्रानुसार (पत्र क्र. एमईडी-2022/प्र.क्र.229(भाग-1)/22/शि-1(ई-661932)), सदर क्षेत्र अनारक्षित करण्यासाठी ’वन (संरक्षण आणि संवर्धन) अधिनियम 1980’ अंतर्गत ’परिवेश’ या संकेतस्थळावर ऑनलाइन व ऑफलाइन प्रस्ताव सादर करण्याची कार्यवाही तातडीने सुरू करण्याचे निर्देश शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, अमरावतीच्या अधिष्ठात्यांना देण्यात आले आहेत.
वैद्यकीय शिक्षण विभागाने दिलेल्या या पत्रामुळे आता शासकीय वैद्यकीय महाविद्यालय अमरावतीमधील कोंडेश्वर-अलियाबाद येथेच होणार असल्याचे निश्चित झाले आहे. दरम्यान, महाविद्यालयाच्या एकूण 1,600 कोटी रुपयांच्या प्रकल्पापैकी 400 कोटी रुपयांचा पहिला टप्पा मंजूर झाला असून, बांधकामाला लवकरच सुरुवात होईल, असा दावा आमदार रवी राणा यांनी केला आहे. पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनीदेखील अमरावती जिल्ह्यातील हे वैद्यकीय महाविद्यालय अमरावतीतच होईल, असे यापूर्वीच स्पष्ट केले होते.




