तिवसा तालुका मदतीच्या पॅकेजमध्ये समाविष्ट करा

तालुका काँग्रेस कमिटीची मागणी : तहसीलदारांना निवेदन

तिवसा /10 ऑक्टोबर : संपूर्ण महाराष्ट्रात पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली असून, शेतकऱ्यांच्या वाट्याला ऐन दिवाळीच्या सणावर संकट आले आहे. या पार्श्वभूमीवर शासनाने 9 ऑक्टोबर 2025 रोजी शासन निर्णयान्वये पॅकेज आणि मदत जाहीर केली. मात्र, या मदतीच्या यादीत अमरावती जिल्ह्यातील तिवसा तालुक्याला हेतूपुरस्सर वगळण्यात आल्याचा आरोप करत आज तिवसा तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले. या निवेदनातून तिवसा तालुक्याचा शेतकरी मदतीच्या शासन निर्णयात समावेश करावा, अशी मागणी करण्यात आली.

यावेळी सरकारच्या शासन निर्णयाची तहसील परिसरात होळी करून निषेध नोंदविण्यात आला. माहे जुलै 25 ते सप्टेंबर 25 या कालावधीत सततच्या पावसामुळे तिवसा तालुक्यात ओला दुष्काळसदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. नदिकाठच्या गावांमधील शेती खरडून गेली असून, सोयाबीन आणि कापूस उत्पादक शेतकरी प्रचंड संकटात सापडले आहेत. अशा वेळी शेतकऱ्यांना सरसकट मदत मिळावी अशी अपेक्षा असताना, प्रशासन आणि शासनाकडून कोणतीही ठोस मदत मिळालेली नाही.

वारंवार विविध पक्ष आणि संघटनांकडून आंदोलने व निवेदने देऊनही प्रशासनाच्या दिरंगाईमुळे तालुक्यातील शेतकरी मदतीपासून वंचित राहिले आहेत. सरकारने जाहीर केलेल्या मदतीच्या यादीत तिवसा तालुका वगळल्याने शेतकऱ्यांमध्ये प्रचंड संतापाची लाट उसळली आहे. त्यामुळे शासन निर्णयामध्ये तिवसा तालुक्याचा समावेश लवकरात लवकर झाला नाही, तर आक्रमक आंदोलन करण्यात येईल, असा इशारा यावेळी देण्यात आला.

या प्रसंगी तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष वैभव स. वानखडे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती रवी राऊत, संचालक विवेक देशमुख, कमलाकर वाघ, शहराध्यक्ष सेतू देशमुख, प्रफुल देशमुख, पंचायत समितीचे माजी उपसभापती लुकेश केने, मोहनराव वानखडे, रमेशराव डहाके, पंकज देशमुख, सतिश पारधी, युवक काँग्रेसचे रितेश पांडव, माजी नगराध्यक्ष योगेश वानखडे, मुकुंद पुनसे, प्रदीप बोके, राजेश थोरात, अमोल पन्नासे, रामदास गवई, दिलीप वानखडे, किशोर गेडाम, सुधीर बोके, आशिष बायस्कर, सुनिल उतखेडे, रामरावजी चव्हाण, सिद्धेश्वर चव्हाण, नितीन मेहकरे, नरेंद्र विघ्ने, प्रफुल गंधे, उमेश नागरमोते, राजूभाऊ वेरुळकर तसेच शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

संबंधित बातम्या

Back to top button