पंढरी परिसरात आढळला पट्टेदार वाघाचा कुजलेला मृतदेह

जागीच शवविच्छेदन करुन दिला अग्निदाह : चौकशी सुरु

वरुड । 3 फेब्रुवारी – तालुक्यातील वाई वर्तुळातील पंढरी बिट खंड क्र.1010 मध्ये पट्टेदार वाघाचा कुजलेल्या स्थितीत मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली असून गेल्या 15 दिवसापूर्वी त्याचा मृत्यू झाल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. हा वाघ कुजलेला असल्याने जागेवरच शवविच्छेदन करुन अग्निदाह करण्यात आले. या वाघाचा मृत्यू नेमका कशाने झाला? याचे कारण अजुन गुलदस्त्यात असून वनविभागाचे अधिकारी सकाळपासूनच घटनास्थळावर तळ ठोकून आहे.
महेंद्री वनसंवर्धन क्षेत्रांतर्गत येणार्‍या वाई वतुर्ळतील पंढरी बिटमध्ये आज 3 ला सकाळच्या सुमारास पट्टेदार वाघाचा कुजलेला मृतदेह आढळून आल्याने एकच खळबळ माजली. वनविभागाचे कर्मचारी गस्तीवर असतांना जंगलातील एका भागातुन दुर्गंधी येत असल्याने संबंधित ठिकाणी कर्मचार्‍यांनी जाऊन बघितले असता जंगली प्राण्याचा कुजलेल्या अवस्थेतील मृतदेह आढळून आला. कर्मचार्‍यांनी लागलीच स्थानिक वनपरिक्षेत्र अधिकारी प्रशांत भुजाडे व इतर अधिकार्‍यांना माहिती दिल्यानंतर स्थानिक वनपरिक्षेत्र कार्यालयातील अधिकारी व कर्मचार्‍यांनी घटनास्थळी धाव घेतली. ‘त्या’ जंगली प्राण्याच्या मृतदेहाचे निरीक्षण केले असता तो मृतदेह पट्टेदार वाघाचा असल्याचे दिसून आले. ही माहिती स्थानिक वनपरिक्षेत्र अधिकारी प्रशांत भुजाडे यांनी वरिष्ठ अधिकार्‍यांना दिल्यावरुन अमरावती येथील वनविभागाचे वरिष्ठ अधिकारी घटनास्थळावर दाखल झाले. घटनास्थळाचा पंचनामा करण्यात आला. त्यानंतर स्थानिक पशु वैद्यकीय अधिकार्‍यांना पाचारण करुन त्या पट्टेदार वाघाच्या मृतदेहाचे पशुधव विकास अधिकारी यांनी एन.टी.सी.ए.च्या मार्गदर्शक सुचनेनुसार जागीच शवविच्छेदन करुन त्याच ठिकाणी त्याच्या कुजलेल्या मृतदेहाला अग्नी देण्यात आला. महेंद्री वनसंवर्धन क्षेत्रांतर्गत वाघाचा वावर असल्याची चर्चा होती. या वाघाच्या मृतदेहवरुन ही शक्यता खरी ठरली आहे. मृतदेह सापडलेल्या वाघाचे वय अंदाजे 4 ते 5 वर्षाचे असावे आणि त्याच्या अंगावर पट्टे असल्यामुळे तो पट्टेदार वाघ असल्याचे निश्चित झाले. सदर वाघाचा मृत्यू नेमका कशामुळे झाला? त्याचा घातपात तर नाही ना किंवा त्याला नैसर्गिक मृत्यू तर प्राप्त झाला नाही ना? याचा शोध वनविभागाचे अधिकारी घेत आहेत. वनविभागाचे वरिष्ठ अधिकार्‍यांनी या वाघाच्या मृत्यूबाबत सखोल तपास सुरु केला असून रुबी नावाचा डॉग घटनास्थळावर पाचारण करण्यात आला असून वाघाच्या मृत्युंचे कारण उलगडण्याचा प्रयत्न वनविभागाकडून सुरु आहे. वाघाच्या मृत्युचे कारण अजुन गुलदस्त्यात असले तरी शवविच्छेदन अहवालाची प्रतिक्षा केली जात आहे. सदर कारवाही उपवनसंरक्षक अर्जुना के.आर., सहाय्यक वनसंरक्षक डॉ.मयूर भैलुमे, विभागीय वन अधिकारी कमलेश पाटील यांचे मार्गदर्शनात वनपरिक्षेत्र अधिकारी प्रशांत भुजाडे व इतर कर्मचारी यांनी केली व पुढील तपास सुरू आहे. सदर पंचनामा व शवविच्छेदन डॉग स्कॉड, अशासकीय संघटना सदस्य, मानद वन्यजीव रक्षक यांचे उपस्थितीत करण्यात आले.

संबंधित बातम्या

Back to top button