एमआयडीसीत सरस्वती ऑईल मिलला भीषण आग

लाखो रुपयांचे साहित्य खाक

* अग्निशामक दलाचे आगीवर नियंत्रण

अमरावती/ 3 जानेवारी : बडनेरा मार्गावरील औद्योगिक वसाहतीत मंगळवारी रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास सरस्वती ऑईल मिलला अचानक भीषण आग लागली. आगीच्या रौद्र रूपामुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले होते, तर या दुर्घटनेत मिलमधील साहित्याचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. अग्निशामक दलाच्या पाच बंबांनी शर्थीचे प्रयत्न करून आगीवर नियंत्रण मिळवले. काही महिन्यांपूर्वीच याच परिसरात एका तेल गिरणीला आग लागली होती, त्यानंतर पुन्हा ही घटना घडल्याने औद्योगिक क्षेत्रातील सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
अमरावती औद्योगिक वसाहतीमधील हनुमान शेठ अग्रवाल यांच्या मालकीच्या सरस्वती ऑईल मिलमध्ये रात्रीच्या वेळी अचानक धूर निघू लागला आणि पाहता पाहता आगीने रौद्र रूप धारण केले. ही आग एवढी भीषण होती की, ज्वाळा आणि धुराचे लोट लांबूनही दिसत होते. मिलमध्ये काम करणार्‍या कर्मचार्‍यांनी आणि परिसरातील सतर्क नागरिकांनी तात्काळ घटनेची माहिती अग्निशामक विभागाला दिली. अमरावती औद्योगिक संघटनेचे अध्यक्ष किरण पातुरकर यांनीही तातडीने अग्निशामक दलाशी संपर्क साधून मदतीसाठी पाण्याचे बंब पाचारण केले.
घटनेचे गांभीर्य ओळखून अग्निशामक दलाचे पाच बंब तातडीने घटनास्थळी दाखल झाले. आगीचा जोर इतका प्रचंड होता की, अग्निशमन जवानांना आग विझवण्यासाठी मोठी कसरत करावी लागली. खबरदारीचा उपाय म्हणून परिसरातील विद्युत पुरवठा खंडित करण्यात आला होता. मिलमध्ये तेल आणि ढेप मोठ्या प्रमाणात असल्याने आगीचा प्रसार शेजारील कारखान्यांकडे होण्याची भीती निर्माण झाली होती. काही कामगार आगीत भाजल्याची शंका आल्याने घटनास्थळी रुग्णवाहिकाही मागवण्यात आल्या होत्या. सुदैवाने, या आगीत कोणतीही जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही, मात्र मालाचे अतोनात नुकसान झाले आहे. शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागली असावी, असा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येत आहे. रात्री उशिरापर्यंत पाण्याचा मारा करून आग पूर्णपणे विझवण्यात प्रशासनाला यश आले.

संबंधित बातम्या

हे सुद्धा वाचा
Close
Back to top button