साठ लाख हेक्टरवरील पिकांचे नुकसान
दोन दिवसात नुकसानीचे आकडे येतील

* केंद्र आणि राज्य सरकार शेतकर्यांच्या पाठीशी
* उपमुख्यमंत्र्यांची माहिती
मुंबई / 30 सप्टेंबर : एकनाथ शिंदे म्हणाले की, राज्यात अनेक ठिकाणी पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांसह सर्व मंत्र्यांनी पूरग्रस्त भागात भेटी देऊन परिस्थितीचा आढावा घेतला. शेतकर्यांवर आलेले संकट खूप मोठे असून, शेतकर्यांशी बोलताना त्यांच्या वेदना जाणवल्या. गेल्या अनेक वर्षांमध्ये अशा प्रकारची पूरपरिस्थिती आणि पाऊस कधीही पडला नाही, त्यामुळे हे संकट गंभीर आहे आणि सरकार शेतकर्यांच्या पाठिशी खंबीरपणे उभे आहे. प्रत्येक आपत्तीवेळी सरकार शेतकर्यांच्या मागे उभे राहिलेले आहे, त्यामुळे आजच्या कॅबिनेट बैठकीत सर्व मुद्द्यांवर चर्चा झाली, अशी माहिती शिंदे यांनी दिली. त्यांनी आणखी सांगितले की, शेतकर्यांना मदत देताना सरकार हात आखडता घेणार नाही. सध्या पंचनाम्यांची माहिती येत आहे, जवळपास साठ लाख हेक्टरवरील जमिनी आणि पिकांचे नुकसान झाले आहे, आणि पुढील दोन-तीन दिवसांत संपूर्ण नुकसानीचे प्रमाण ठोसपणे समोर येईल. त्यामुळे शेतकर्यांना मदत करताना अटी, शर्ती आणि नियम बाजुला ठेवून त्यांचा पाठिंबा द्यावा, अशी सर्वांची भावना आहे. मोठ्या अतिवृष्टीमुळे संकट आलेल्या वेळी मदत करणे ही सरकारची जबाबदारी व कर्तव्य आहे. नुकसानीची संपूर्ण माहिती आल्यानंतर मुख्यमंत्री फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि आम्ही एकत्र बसून शेतकर्यांसाठी ठोस निर्णय घेऊ, असे शिंदे यांनी स्पष्ट केले. त्यांनी सांगितले की, नियम, अटी आणि शर्ती बाजुला ठेवण्याचा निर्णय यापूर्वी देखील सरकारने घेतला होता. तसेच, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना शेतकर्यांच्या मदतीबाबत निवेदन दिले गेले आहे आणि आमच्या तिघांच्या सहीचे पत्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दिलेले आहे. केंद्र सरकार आणि पंतप्रधान मोदी शेतकर्यांच्या पाठीशी उभे आहेत, आणि केंद्र व राज्य सरकार शेतकर्यांच्या पाठीशी उभे राहतील, असा विश्वास एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला.




