कौतुकाची थाप! अनिलजीच्या निवडीने चाहते भारावले !
महापालिका परिसरात लाडक्या नेत्याचं जंगी स्वागत

* गुलालाची उधळण अन् ढोल-ताशांचा कडकडाट
अमरावती / 20 फेब्रुवारी : राजस्थानी हितकारक मंडळाचे अध्यक्ष, दैनिक अमरावती मंडल व दैनिक आपली मातृभूमीचे ज्येष्ठ संपादक आणि जिल्हा मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष अनिल जुगलकिशोरजी अग्रवाल यांची अमरावती महानगरपालिकेच्या स्वीकृत सदस्यपदी निवड होताच संपूर्ण शहरात आनंदाचे उधाण आले आहे. एका अनुभवी पत्रकाराने आणि निष्ठावान समाजसेवकाने महापालिकेच्या पवित्र सभागृहात पाऊल ठेवल्यामुळे अमरावतीच्या विकासाला नवी गती मिळेल, अशी आशा पल्लवित झाली आहे. शुक्रवारी ही घोषणा होताच महापालिका परिसराला जणू अथांग जनसागराचे स्वरूप आले होते. हजारो कार्यकर्त्यांनी आपल्या लाडक्या नेत्याचे स्वागत करण्यासाठी सकाळपासूनच गर्दी केली होती.
अनिल अग्रवाल यांच्या निवडीची अधिकृत घोषणा होताच परिसरात वार्यासारखी बातमी पसरली. माहेश्वरी समाज, ओसवाल समाज, राजस्थानी ब्राह्मण महासभा, राजपुरोहित महासभा यांसह विविध समाजातील प्रमुखांनी आणि गणमान्य नागरिकांनी महापालिकेत धाव घेऊन अग्रवाल यांचे पुष्पहार घालून स्वागत केले. समर्थकांचा उत्साह इतका शिगेला पोहोचला होता की, त्यांनी आपल्या नेत्याला थेट खांद्यावर उचलून घेतले. ढोल-ताशांच्या कडकडाटात आणि फटाक्यांच्या धडाक्यात संपूर्ण परिसर दुमदुमून गेला होता. भगवे फेटे बांधलेले कार्यकर्ते आणि गुलालाची उधळण यामुळे जणू विजयाची दिवाळीच साजरी होत असल्याचे चित्र दिसत होते.
परकोट्याच्या आतील भागातून आलेल्या हजारो चाहत्यांनी आणि सामान्य कार्यकर्त्यांनी अग्रवाल यांना अक्षरशः फुलांच्या माळांनी लादले होते. ही केवळ एका पदाची निवड नसून, अग्रवाल यांनी आजवर पत्रकारिता, सामाजिक कार्य आणि जनसेवेतून कमावलेल्या अफाट जनसंपर्काची ही खरी पोचपावती आहे. सर्वधर्मीय समाजबांधवांनी एकत्र येत त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला. आमचा नेता, विकासाचा नेता अशा घोषणांनी महापालिका परिसर दणाणून गेला होता. विशेष म्हणजे, प्रशासकीय कामकाजाची सखोल जाण असलेल्या अग्रवाल यांच्यामुळे आता महापालिकेच्या राजकारणात एक अभ्यासू व्यक्तिमत्व सक्रिय झाले आहे.
या ऐतिहासिक क्षणी विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी, सामाजिक संस्थांचे प्रतिनिधी आणि पत्रकार बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून अग्रवाल यांचे अभिनंदन केले. त्यांच्या या निवडीमुळे केवळ एका समाजाचे नव्हे, तर संपूर्ण अमरावती शहराचे प्रश्न प्रभावीपणे मांडले जातील, असा विश्वास सर्वांनी व्यक्त केला. अनिल अग्रवाल यांच्या पुढील राजकीय प्रवासाला या अभूतपूर्व प्रतिसादाने मोठी ताकद मिळाली असून, त्यांच्यावर सर्वच स्तरांतून कौतुकाचा वर्षाव होत आहे.
लोकशाहीचा बुलंद आवाज आता मनपाच्या सभागृहात
जेष्ठ पत्रकार अनिल अग्रवाल यांनी आपल्या धारदार लेखणीतून नेहमीच सामान्य जनतेचे प्रश्न प्रशासनासमोर मांडले आहेत. आता प्रत्यक्ष सभागृहात सदस्य म्हणून काम करण्याची संधी मिळाल्याने, शहराच्या मूलभूत सोयीसुविधा आणि विकासाच्या मुद्द्यांवर ते आक्रमकपणे दाद मागतील. त्यांचा प्रदीर्घ अनुभव आणि सर्वसमावेशक नेतृत्व यामुळे महापालिकेच्या कामकाजात गुणात्मक बदल होईल, अशी खात्री शहरवासीयांना वाटत आहे.




