अंजनगावात शेती अवजारे चोरणारा भामटा अटकेत

लोखंडी नांगर चोरणारा मुख्य सूत्रधार ताब्यात

* साडेचार लाखांचा मुद्देमाल हस्तगत एक फरार

अंजनगाव सुर्जी/ 20 फेब्रुवारी  : शेतकर्‍यांच्या शेतातील अवजारांवर डल्ला मारणार्‍या एका सराईत टोळीचा अंजनगाव सुर्जी पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. बोरागळा येथील एका शेतकर्‍याचा लोखंडी नांगर चोरल्याप्रकरणी पोलिसांनी तांत्रिक तपासाच्या आधारे प्रशांत विनोद इंगोले (वय 26, रा. जवळा बु.) याला अटक केली आहे. त्याच्याकडून चोरीसाठी वापरलेला ट्रॅक्टर आणि नांगर असा एकूण 4 लाख 50 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून, त्याचा एक साथीदार अद्याप फरार आहे. बोरागळा येथील रहिवासी विशाल अरुणलाल चिकटे (वय 38) यांनी त्यांच्या शेतातील लोखंडी नांगर चोरीला गेल्याची तक्रार पोलीस ठाण्यात दिली होती. या तक्रारीवरून भारतीय न्याय संहितेच्या कलम 303(2) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. ठाणेदार सुरज बोंडे यांनी तातडीने गुन्हे शोध पथकाला तपासकामी रवाना केले. पथकाने अत्यंत कौशल्याने तपास करून संशयित प्रशांत इंगोले याला ताब्यात घेतले. पोलिसी खाक्या दाखवताच त्याने आपला साथीदार धिरज गिरी (रा. जवळा बु.) याच्या मदतीने चोरी केल्याची कबुली दिली.
पोलिसांनी या कारवाईत थोरात कंपनीचा लोखंडी नांगर (किंमत 40,000 रुपये), गुन्ह्यात वापरलेला काळ्या रंगाचा ट्रॅक्टर (किंमत 4,00,000 रुपये) आणि 10,000 रुपये किमतीचा भ्रमणध्वनी असा एकूण 4.50 लाखांचा मुद्देमाल पंचांसमक्ष जप्त केला आहे. या प्रकरणातील दुसरा आरोपी धिरज गिरी याचा शोध पोलीस घेत आहेत.
ही धाडसी कारवाई पोलीस अधीक्षक विशाल आनंद, अप्पर पोलीस अधीक्षक पंकज कुमावत, उपविभागीय पोलीस अधिकारी मनिष ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सुरज बोंडे, पोलीस उपनिरीक्षक भारत चिरडे, पोलीस अंमलदार जयसिंग चव्हाण, रवी राठोड, अमित घाटे, आकाश रंगारी, शुभम मार्कंड आणि मोहसीन खान पठाण यांनी यशस्वीरीत्या पूर्ण केली.
शेतकर्‍यांच्या मालावर डल्ला मारणारे रडारवर-अंजनगाव सुर्जी परिसरात शेती अवजारांच्या चोरीचे प्रमाण वाढत असल्याने पोलिसांनी आता विशेष लक्ष केंद्रित केले आहे. अटक केलेल्या आरोपीकडून आणखी काही चोर्‍यांचे गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता वर्तवण्यात येत असून फरार आरोपीला लवकरच जेरबंद केले जाईल.

संबंधित बातम्या

Back to top button