शेतकर्यांना हेक्टरी 50 हजार रुपये द्या
राज्यात ओला दुष्काळ जाहीर करा

* हर्षवर्धन सपकाळ यांचा फडणवीस सरकारवर हल्लाबोल
मुंबई /23 सप्टेंबर : राज्यात यावर्षी सरसरीपेक्षा दुप्पट, तिप्पट पाऊस पडला आहे. 36 जिल्हे व 358 तालुक्यापैकी 30 जिल्हे व जवळपास 300 तालुके अतिवृष्टी आणि पूरग्रस्त आहेत. राज्यभरात जवळपास 143 लाख हेक्टरवरील शेतीचे प्रचंड नुकसान झाले आहे. पाऊस सातत्याने पडत असून शेतकरी हवालदिल झाला आहे, परंतु राज्यातील महायुती सरकारला शेतकर्यांची चिंता नाही, पालकमंत्र्याने पाहणी सुद्धा केली नाही. मंत्रिमंडळात बैठकीत फक्त कोरडी चर्चा झाली. सरकारने झोपेतून जागे व्हावे व संकटातील शेतकर्याला हेक्टरी सरसकट 50 हजार रुपये तातडीने द्यावेत आणि शेतजमीन खरडून गेली त्यांना हेक्टरी 5 लाख रुपये द्यावेत, अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केली आहे. पत्रकार परिषदेत बोलताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी महायुती सरकारवर चौफेर हल्ला केला. ते पुढे म्हणाले की, मुसळधार पावसामुळे मराठवाडा, विदर्भातील काही जिल्हे, सोलापूर, अहिल्यानगर या जिल्ह्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. मराठवाड्यात तर अत्यंत वाईट परिस्थिती आहे. काँग्रेस पक्ष मागील दोन महिन्यापासून शेतकर्यांना मदत देण्याची मागणी करत आहे, पण शेतकरी विरोधी महायुती सरकार मात्र पोकळ ओशासने देत आहे. पावसाने हाहाकार माजवला आहे, शेतातील पिकं, जमीन, पुशधन, गृहपयोगी साहित्य सर्व वाहून गेले, पण राज्यातील आंधळं, बहिरं व मुक्या सरकारला त्यांच्या वेदना दिसत नाहीत. मंत्र्यांना जिल्ह्यात जाऊन दौरे कराव्या लागतात, हे अत्यंत दुर्दैवी आहे. निवडणुकीच्या प्रचारात शेतकर्यांना कर्जमाफी देण्याचे ओशासन दिले होते, त्याचे काय झाले, असा सवाल सपकाळ यांनी विचारला. काँग्रेसचे नेते शेतकर्यांच्या बांधावर जाणार – काँग्रेस सरकार असताना पिकाचे लाल्या रोग, बोंड आळीने नुकसान केले, गारपीट चक्रीवादळाने नुकसान केले की तातडीने मदत दिली जात, पण भाजपा युतीचे सरकार मात्र नियम, अटी, शर्ती यातच अडकून पडले आहे. एवढे मोठे नुकसान झाले असतानाही पंचनामे कसले करतात, आधी मदत द्या, मग कागदी सोपस्कार पूर्ण करा. सरकारचे मंत्री झोपले असताना काँग्रेसने समिती नेमून पूरग्रस्त भागाची पाहणी सुरू केली आहे. नुकसानग्रस्त भागात जाऊन पाहणी करणार आहे, असेही हर्षवर्धन सपकाळ यांनी सांगितले.




