मध्यप्रदेशच्या सीमेवर शस्त्रांचा कारखाना
पंजाबच्या दोन तरुणांकडून दोन पिस्तुल जप्त

* धारणी नजीकच्या पाचोरी येथील गृह उद्योगाप्रमाणे शस्त्राचे कारखाने
अमरावती / 20 मार्च : मेळघाटच्या अतिदुर्गम आणि सुरक्षित मानल्या जाणार्या घनदाट अरण्याला लागून असलेल्या मध्यप्रदेशातील खकनार परिसरात पुन्हा एकदा बेकायदा शस्त्रांच्या निर्मितीचे काळे साम्राज्य धगधगत असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे.
18 मार्च रोजी मध्यप्रदेश पोलिसांनी एका थरारक कारवाईत सतोड फाट्यावरील हनुमान मंदिराजवळ सापळा रचून पंजाब राज्यातील दोन कुख्यात आंतरराज्यीय तस्करांना जेरबंद केले. जसविंदरसिंग जसपालसिंग (वय 20, रा. रोहिया खास) आणि सिमरजितसिंग (वय 19) अशी या अटक करण्यात आलेल्या गुन्हेगारांची नावे असून, त्यांच्या ताब्यातून ’पाचोरी’ बनावटीची दोन घातक पिस्तुलं, जिवंत काडतूसं आणि सुमारे दोन लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आल्याने गुन्हेगारी विश्वात मोठी खळबळ उडाली आहे. धारणी तालुक्याच्या सीमेपासून अवघ्या 18 किलोमीटर अंतरावर असलेल्या खकनार तालुक्यातील पाचोरी गाव आता केवळ गाव राहिले नसून, ते अवैध शस्त्रांचे जणू ’माहेरघर’ बनले आहे. येथे घराघरात एखाद्या अधिकृत गृहउद्योगाप्रमाणे पिस्तुलं आणि मॅगझीन तयार करण्याचे कारखाने अहोरात्र सुरू असल्याचे या कारवाईतून पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे. पोलीस अधीक्षक देवेंद्र पाटीदार यांच्या थेट मार्गदर्शनाखाली, अतिरिक्त पोलीस अधीक्षक अंतरसिंग कनेश, उपविभागीय पोलीस अधिकारी निर्भयसिंग उलावा आणि खकनारचे ठाणेदार अभिषेक जाधव यांच्या रणनीतीनुसार ही मोहीम फत्ते करण्यात आली. उपनिरीक्षक शंकर लोनो यांच्या नेतृत्वातील पथकातील मनोज मोरे, जय मालवीय, दारसिंग, शिवनारायण पाल आणि वसीम खान या बहादूर पोलिसांनी जीवाची बाजी लावून या तस्करांच्या मुसक्या आवळल्या.
मेळघाटच्या डोंगरदर्यांतून चालणारी ही शस्त्रांची तस्करी आता थेट पंजाबच्या सीमेपर्यंत पोहोचल्याने यंत्रणांचे धाबे दणाणले आहेत. वारंवार होणार्या पोलीस कारवायांनंतरही पाचोरीतील शस्त्रांचे लोखंडी सत्र थांबायला तयार नाही, ही बाब अमरावती आणि बुलडाणा जिल्ह्यांच्या सुरक्षेसाठी धोक्याची घंटा ठरत आहे. या कारवाईमुळे आंतरराज्यीय टोळ्यांचे मनसुबे धुळीस मिळाले असले, तरी सीमेवर फोफावणार्या या बेकायदा शस्त्रास्त्रांच्या बाजारपेठेने पोलीस प्रशासनासमोर मोठे आव्हान उभे केले आहे.
मेळघाटच्या सीमेवर शस्त्रांचा व्यापार
पाचोरी गावात तयार होणारी ही बनावट पिस्तुलं थेट पंजाबमधील टोळ्यांपर्यंत पोहोचत असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. दोन लाखांच्या मुद्देमालासह पकडलेल्या या तरुणांमुळे आंतरराज्यीय गुन्हेगारीचे मोठे धागेदोरे हाती लागण्याची शक्यता वर्तवली जात आहे.




