विदर्भाला अवकाळी पावसाचा येल्लो अलर्ट !
पुढच्या 48 तासात गारपीट आणि वादळी वार्यांची शक्यता

नागपूर /20 मार्च : विदर्भात सध्या हवामानात मोठे बदल होत असून, हवामान विभागाने पुढील काही दिवसांसाठी यलो अलर्ट जारी केला आहे. या कालावधीत विदर्भातील अनेक जिल्ह्यांमध्ये वादळी पाऊस, विजांचा कडकडाट आणि काही ठिकाणी गारपीट होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.
हवामान तज्ज्ञांच्या अंदाजानुसार, विदर्भातील बहुतांश भागात सध्या ढगाळ वातावरण निर्माण झाले असून, पुढील 48 तासांत मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे. काही भागांत हलक्या ते मध्यम स्वरूपाची गारपीटही होऊ शकते.विदर्भातील अनेक जिल्ह्यांमध्ये आज दुपारी 4 नंतर पावसाची तीव्रता वाढण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. विशेषतः नागपूर, गोंदिया आणि अमरावती जिल्ह्यांत काही ठिकाणी वादळी वार्यासह गारपीट होऊ शकते.तसेच बुलढाणा, अकोला, चंद्रपूर आणि भंडारा येथे ताशी सुमारे 40 ते 50 किमी वेगाने वारे वाहण्याचा अंदाज असून, विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता आहे. वर्धा, गडचिरोली, यवतमाळ आणि वाशिम या जिल्ह्यांत तुरळक ठिकाणी विजांसह पावसाचा इशारा देण्यात आला आहे. याशिवाय, मराठवाड्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये वादळी वार्यासह पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. उत्तर महाराष्ट्रातील जळगाव जिल्ह्यात ताशी 50 ते 60 किमी वेगाने वारे वाहण्याचा अंदाज असून, तेथेही विजांसह पावसाची शक्यता आहे.




