उपराष्ट्रपती निवडणुकीत भाजपने खासदारांना 15-20 कोटी वाटले

अभिषेक बॅनर्जींचा स्फोटक आरोप

-क्रॉस-व्होटिंगवर राजकीय वादंग
नवी दिल्ली / 11 सप्टेंबर  : उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत इंडिया आघाडीला मोठा धक्का बसला. या पराभवानंतर तृणमूल काँग्रेसचे खासदार व पक्षनेते अभिषेक बॅनर्जी यांनी खळबळजनक आरोप केला आहे. भाजपने उपराष्ट्रपती निवडणुकीत प्रत्येक खासदाराला 14 ते 15 कोटी रुपये देऊन मतं खरेदी केली. काहींवर तर 15-20 कोटी रुपयांचा खर्च झाला. निवडून आलेले प्रतिनिधी जनतेचा विश्वास विकतात, भावना विकतात. प्रतिनिधी खरेदी करता येतात, पण जनता नाही, असा थेट आरोप बॅनर्जी यांनी केला. क्रॉस-व्होटिंगच्या चर्चेला वाव मिळाला असला तरी बॅनर्जी म्हणाले, गुप्त मतदान असल्याने कुणी विरोधात मतदान केले हे स्पष्ट सांगता येत नाही. आमचे सर्व 41 खासदार (लोकसभेतील 18 व राज्यसभेतील 23) उपस्थित होते आणि त्यांनी बी. सुदर्शन रेड्डींनाच मत दिलं. मात्र, 15 विरोधी सदस्यांची मतं अवैध ठरली. त्यामुळे खरोखर किती जणांनी क्रॉस-व्होटिंग केलं हे अंधारात आहे. पण अंदाजानं 5-7 विरोधी खासदारांनी क्रॉस-व्होटिंग केलं असावं.
बॅनर्जी यांनी भाजपवर जुने आरोपही पुनरुच्चारले. 2021 च्या पश्चिम बंगाल निवडणुकीत, महाराष्ट्रात आणि झारखंडातही पैशाच्या बळावर आमदारांची खरेदी झाली, सरकारं कोसळली. 2024 च्या लोकसभा निवडणुकीत तर मतदान एजंट खरेदी करण्यासाठी 5,000 ते 10,000 रुपये वाटले. पण बंगालच्या जनतेनं दाखवून दिलं – नेते विकले जाऊ शकतात, पण जनता विकत घेता येत नाही, असे बॅनर्जी म्हणाले.
बंगालमधील मतदार यादीतील त्रुटींवर बॅनर्जी यांनी निवडणूक आयोगावरही निशाणा साधला. जर ही यादीच अवैध असेल, तर ह्याच यादीवर निवडून आलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि संपूर्ण सरकारही अवैध आहे. अशा परिस्थितीत लोकसभा विसर्जित करावी, नवी निवडणूक जाहीर करावी. अशा वेळी आम्ही ‘संपूर्ण भारत पुनर्निवडणूक’ (डखठ) ला पाठिंबा देऊ, अशी ठाम भूमिका त्यांनी मांडली.

संबंधित बातम्या

Back to top button