फायर ऑडिटबाबत मनपाची कोचिंग क्लासेस संचालकांसोबत बैठक

विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेशी तडजोड नाही; अग्निसुरक्षा नियमांचे काटेकोर पालन करण्याचे आयुक्त वर्षा लड्डा यांचे निर्देश

अमरावती/29 जून– अमरावती शहरातील शैक्षणिक संस्थांमध्ये शिक्षणासाठी येणार्‍या हजारो विद्यार्थ्यांच्या जिवाचा प्रश्न गंभीर असून त्यांच्या सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य देणे आता अनिवार्य झाले आहे. शहरातील सर्व खासगी शिकवणी वर्गांमध्ये अग्निसुरक्षेच्या उपाययोजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी महानगरपालिका आयुक्त वर्षा लड्डा यांनी पुढाकार घेत आज 29 जून 2026 रोजी महापालिका सभागृहात शिकवणी वर्गांच्या संचालकांची विशेष बैठक घेतली. या बैठकीत अग्निसुरक्षा नियमावलीचे काटेकोर पालन करण्याचे आणि फायर ऑडिट पूर्ण करण्याचे स्पष्ट निर्देश देण्यात आले आहेत.
विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेबाबत कोणतीही तडजोड खपवून घेतली जाणार नाही, असे बजावताना आयुक्त वर्षा लड्डा यांनी सांगितले की, शिकवणी वर्ग हे केवळ व्यवसायाचे केंद्र नसून ती विद्यार्थ्यांच्या भवितव्याची आणि सुरक्षेची जबाबदारी आहे. प्रत्येक इमारतीत अग्निशमन यंत्रणा सुस्थितीत असणे, आपत्कालीन बाहेर पडण्याचे मार्ग मोकळे असणे, वीज यंत्रणेची नियमित तपासणी करणे आणि आग लागल्यास त्वरित सामना करण्याची साधने सज्ज ठेवणे हे आता प्रत्येक संस्थेसाठी बंधनकारक करण्यात आले आहे. फायर ऑडिट केवळ कागदी घोडे नाचवण्यासाठी नसून ती विद्यार्थ्यांच्या जीव वाचवण्याची एक अत्यंत महत्त्वाची प्रक्रिया आहे. ज्या संस्था या नियमांकडे दुर्लक्ष करतील, त्यांच्यावर कायद्यानुसार कठोर कारवाई केली जाईल, असा इशारा प्रशासनाने दिला आहे. याचसोबत हॉस्पिटल आणि शिकवणी वर्गांसाठी एकसमान आणि प्रभावी कार्यप्रणाली तयार करण्याचे निर्देशही आयुक्तांनी अग्निशमन विभागाला दिले आहेत. या बैठकीला अतिरिक्त आयुक्त शिल्पा नाईक, उपायुक्त नरेंद्र वानखडे, शहर रचना विभागाचे सहायक संचालक सागर वानखडे, मुख्य अग्निशमन अधिकारी दिनेश हंबर्डे, सहायक आयुक्त भूषण पुसतकर, मंगेश कडू, शिक्षणाधिकारी डॉ. प्रकाश मोलाम, बाजार परवाना विभागाचे उदय चव्हाण यांच्यासह शहरातील विविध शिकवणी वर्गांचे संचालक उपस्थित होते. प्रशासनाच्या या निर्णयामुळे विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न अधिक गंभीरतेने हाताळला जाणार आहे.
सर्व शिकवणी वर्गांनी विहित कालावधीत अग्निसुरक्षा ऑडिट पूर्ण करून त्याचा अहवाल महापालिकेकडे सादर करणे अनिवार्य आहे. नियमांचे उल्लंघन करणार्‍या संस्थांवर प्रशासनाकडून कायदेशीर कारवाई करण्यात येणार असून विद्यार्थ्यांचे सुरक्षित आणि जबाबदार शैक्षणिक वातावरण जपण्यासाठी शिकवणी वर्गांनी प्रशासनाला पूर्ण सहकार्य करावे.

संबंधित बातम्या

Back to top button